निवडणुका कधीही लागल्या तरी आम्ही तयार आहोत : शरद पवार

Sharad Pawar​ On Election : शरद पवार यांनीही राज्य सरकारवर हल्लाबोल चढवला आहे.  

Updated: Jul 29, 2022, 03:42 PM IST
निवडणुका कधीही लागल्या तरी आम्ही तयार आहोत : शरद पवार title=

नाशिक : Sharad Pawar On Election : राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडवणीस यांचे सरकार स्थापन होऊन महिना होत आला तरी मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्याने काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीने टीकास्त्र सोडले आहे. आता महाविकास आघाडीचे स्थापन करणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. सरकार पडेल निवडणुका लागतील हे सांगायला मी ज्योतिष नाही, असे सांगत निवडणुका कधीही लागल्या तरी आम्ही तयार आहोत, असे पवार यांनी यावेळी म्हटले. 

जवळपास एक महिना झाला राज्याला मंत्री नाही. राज्यात पूरपरिस्थिती असताना काम करण्यासाठी मंत्री मंडळ टीम असणं आवश्यक आहे. विरोधी पक्षाचे नेते, लोक संकटात आहे ते तिकडे भेटी देत आहेत. यातून मुख्यमंत्री यांनी बोध घ्यावा, असा जोरदार टोला मुख्यमंत्री शिंदे यांना शरद पवार यांनी हाणला.

स्वागताचे कार्यक्रम घ्यायचे की शेतकरी भेटी घ्यायच्या हा विरोधाभास तुम्हीच बघत आहात. मालेगाव जिल्हा निर्मितीबाबत निर्णय घेतल्यावर बघू, असे सांगत सरकार पडेल निवडणुका लागतील हे सांगायला मी ज्योतिष नाही. निवडणुका कधीही लागल्या तरी आम्ही तयार आहोत, असे यावेळी पवार म्हणाले.

न्यायलयाने obc आरक्षणावर दिलेला निर्णय चिंताजनक आहे. यामुळे मोठा वर्ग नाराज होईल,हा वर्ग सत्तेबाहेर जातो की काय अशी भीती याने निर्माण झाली आहे. जे प्रकल्प आमच्या सरकारने मंजूर केले टेंडर निघाले त्याला विलंब करणे किंवा रद्द करणे योग्य नाही, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आघाडी करायची की नाही हे नंतर बघू, आगोदर obc बाबत निर्णय होऊ द्या, असे पवार म्हणाले.

 आमच्या घटक पक्षानी एकत्र निवडणूक लढवावी, अशी तरी सद्या आमची भूमिका आहे. आपल संघटन खीळखीळ झालंय का यावर बोलताना पवार म्हणाले, ज्या वेळेस निवडणुका लागतील तेंव्हा जनता कौल देईल.