Maharashtra Weather News : शुक्रवारपर्यंत उघडीप देणाऱ्या पावसानं आता पुन्हा एकदा बरसण्यास सुरुवात केली असून, हा पाऊस पुढील काही दिवस तरी राज्यातील बहुतांश भागांची पाठ सोडणार नाही, असंच चित्र पाहायला मिळत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हे परिणाम दिसणार असून पुढचे चार ते पाच दिवस राज्यातील कोकण किनारपट्टीसह विदर्भाला पावसाचा तडाखा बसणार आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पुढील 24 तासांसाठी आकाश अंशतः ढगाळ आकाश राहील आणि हलका ते मध्यम पाऊस इथं पडू शकतो. शहरात पहाटेपासूनच पावसाच्या ढगांचं सावट राहणार असून, अधूनमधून येणाऱ्या सरी नागरीकांची त्रेधातिरपीट उडवू शकतात. दरम्यान तापमानात मात्र फारसे बदल अपेक्षित नसून, कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 32°C आणि 25°C च्या आसपास असेल.
तिथं दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहून पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सध्याच्या घडीला गुजरातमध्ये सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा आणि सोबत तीव्र होणारे चक्राकार वारे अरबी समुद्राच्या दिशेनं सरकले असून पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात ही प्रणाली अधिक सक्रीय होताना दिसत आगे. दरम्यान सध्या अरबी समुद्रात असणाऱ्या या वादळाची दिशा दक्षिण पश्चिमेला असल्यामुळं राज्यात मुसळधार नव्हे पण मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता आहे. पुढं 6 सप्टेंबर रोजी नव्यानं कमी दाबाचं क्षेत्र तयार होणार असून 6 ते 9 सप्टेंबरदरम्यान राज्याच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढलेला असेल.