Maharashtra Weather Update : हवामान विभागाच्या सविस्तर माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर काही अंशी ओसरणार असून, मुंबई, ठाणे आणि पालघर इथं पाऊस विश्रांती घेताना दिसणार आहे. तर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मंगळवारी रात्रीपासूनच जिल्ह्यातील विविध भागांमध्ये कोसळणारा मुसळधार पाऊस आता ओसरताना दिसत आहे. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव आज जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहिर करण्यात आलीय.
भंडारा गोंदिया जिल्ह्याला पावसानं चांगलंच झोडपून काढलंय. जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत. वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत होत असलेली वाढ पाहता गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशरा देण्यात आला आहे.
गडचिरोलीमध्येही पावसाचा हाहाकार पहायला मिळतोय. इथं भामरागड येथे पूरस्थिती बिकट झालीये. पर्लकोटा नदीचं पाणी भामरागड शहरात शिरलं असल्यामुळं पुरात अडकलेल्या दोन गंभीर रुग्णांना बोटीच्या सहाय्यानं बाहेर काढण्यात आलं आहे. जिल्ह्यातील प्रमुख 17 मार्ग बंद झालेत. 24 तासांत जिल्ह्यात 80 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक 154 मिलीमीटर पाऊस कोरची येथे झाला आहे. गोसेखुर्द धरणाचा विसर्ग 2.20 लाख क्युसेक इतका वाढवण्यात आला आहे. वैनगंगा आणि गोदावरी नदीपात्रात मोठा विसर्ग होत असल्याने नदीकाठच्या गावांची चिंता वाढली असून सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.
बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा आता ओसरू लागल्यामुळं राज्यातही पावसाचा जोर कमी होताना दिसत आहे. दरम्यान, गुजरातच्या दक्षिणेपासून केरळपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळं विदर्भात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गासह मध्य महाराष्ट्र, नाशिक, पुणे, कोल्हापूर, साताऱ्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 12 सप्टेंबर अर्थात गुरुवारपासून राज्यात पावसाचा जोर ओसरण्याची चिन्हं आहेत. त्यामुळं आता पावसाचा परतीचा प्रवास दूर नसून, तो नेमका कोणच्या दिशेला विरून जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.