Maharashtra Weather News : 'या' भागांमध्ये मंदावला मान्सून; 'इथं' मात्र जोरदार हजेरी, राज्यातील पर्जन्यमानाचं सविस्तर वृत्त

Maharashtra Weather News : महाराष्ट्रात दाखल झालेल्या मान्सूननं सध्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये हजेरी लावलेली असतानाच या नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग काही अंशी मंदावल्याचं पाहायला मिळत आहे.   

सायली पाटील | Updated: Jun 14, 2024, 07:33 AM IST
Maharashtra Weather News : 'या' भागांमध्ये मंदावला मान्सून; 'इथं' मात्र जोरदार हजेरी, राज्यातील पर्जन्यमानाचं सविस्तर वृत्त  title=
Maharashtra Weather updates heavy rainfall to konkan monsoon might slowdown

Monsoon Updates : सुरुवातीच्या आठवड्यामध्ये राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसानं चांगली हजेरी लावलेली असतानाच मान्सूनचा दुसरा आठवडा मात्र काहीसा बेताचाच गेला असं म्हणायला हरकत नाही. राज्याच्या कोकण भागासह मराठवाडा आणि मुंबई शहर, उपनगरामध्ये जोरदार बरसणाऱ्या या मान्सून वाऱ्यांचा वेग काहीसा मंदावला. पण, ज्या विदर्भात मान्सूननं अपेक्षित वेळेत हजेरी लावली नव्हती तिथं मात्र हवामान विभागानं यलो अलर्ट जारी केला आहे. 

हवामान विभागाच्या माहितीनुसार विदर्भात शुक्रवारी (14 जून 2024) पावासाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भाच्या यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि अकोल्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, पुढील 24 तासात मुंबईतही हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.  विदर्भ वगळता उर्वरीत महाराष्ट्रात पावसाचा ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे बहुतांश भागात तुरळक पाऊस होण्याची शक्यता आहे. 

कोकणात सध्या पावसाच्या मध्यम ते मुसळधार सरी कोसळत असून, त्यामुळं दरडी कोसळण्याचं प्रमाण दिवसागणिक वाढताना दिसत आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरी-कोल्हापूरला जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटात या पावसामुळं दरड कोसळली असून घाटातील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे. 

कुठे स्थिरावले मान्सूनचे वारे, कुठे मंदावला वेग? 

सातत्यानं आगेकूच करणाऱ्या मान्सूननं गुरुवारी फारशी प्रगती केली नाही. सध्या हे नैऋत्य मोसमी वारे जळगाव, अमरावती भागातच असून, पुढील 48 तासांहून अधिक काळासाठी इथं पावसाचा जोर तुलनेनं कमी राहील. पण, वादळी वारे आणि ढगांच्या गडगडाटासह सरी कोसळण्याची शक्यता आहे. 

बंगालच्या उपसागरावर सक्रिय असणारे मोसमी वारे जवळपास पाच दिवसांपासून मंदावले असून, त्याचा परिणाम राज्यातील पर्जन्यमानावर होताना दिसत आहे. प्राथमिक स्वरुपात वर्तवलेल्या अंदाजानुसार शुक्रवारपासून पुढच्या पाच दिवसांसाठी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर,ग नाशिक आणि मुंबई, कोकणात पावसाचा जोर कमी असेल. ज्यामुळं शेतीची कामं लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.