Maharashtra Weather News : राज्याच्या 'या' भागात वादळी पावसाचा अंदाज; कोकणात काय परिस्थिती?

Maharashtra Weather  News : महाराष्ट्रात दणकून उपस्थित झालेला मान्सून आता राज्याच्या बहुतांश भागांमध्ये हजेरी लावत असला तरीही काही भाग मात्र यास अपवाद ठरत आहेत.   

सायली पाटील | Updated: Jun 12, 2024, 08:08 AM IST
Maharashtra Weather  News : राज्याच्या 'या' भागात वादळी पावसाचा अंदाज; कोकणात काय परिस्थिती?  title=
Maharashtra Weather updates yellow alert in sindhudurga monsoon awaited in vidarbha

Maharashtra Weather  News : हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यावर पुढील 24 तासांमध्ये मान्सूनची कृपा पाहायला मिळेल. तर, विदर्भ पट्टा मात्र अद्यापही मान्सूनच्या प्रतीक्षेत दिसेल. पुढील 24 तासांमध्ये मुंबई आणि उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण राहणार असून, अंशत: पावसाची हजेरीसुद्धा पाहायला मिळू शकते. 

शहराच्या काही भागांमध्ये मुसळधार ते मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता असून, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड रत्नागिरी त हवामान खात्याचा ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. तर, कोकणातील सिंधुदुर्गात हवामान खात्यानं पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. (Monsoon Updates)

विदर्भाला अद्यापही मान्सूनची प्रतीक्षा... 

मराठवाड्यापर्यंत मान्सूननं मजल मारली असूनही पूर्व विदर्भ अजूनही मान्सूनच्या प्रतीक्षेत आहे. पश्चिम विदर्भात मान्सून दाखल झाला असून, यवतमाळ, वाशीम, बुलढाणा, अकोला जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे. मात्र पूर्व विदर्भासाठी अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

हेसुद्धा वाचा : माळशेज घाटात दरड कोसळल्याने दोघांचा मृत्यू! रिक्षावर डोंगरकडा पडून काका-पुतण्याचा अंत

 

पूर्व विदर्भात अद्याप मान्सूनचा सकारात्मक प्रवास नसल्याने पूर्व विदर्भाला मान्सूनची अजूनही प्रतीक्षा कायम आहे. विदर्भातील आगमनाची तारीख साधारणतः 15 जून असली तरी यंदा चार दिवस आधीच पश्चिम विदर्भात मान्सूनचं आगमन झालं आहे. वस्तुस्थितीनुसार विदर्भातील काही जिल्ह्यात सामान्य वातावरण असल तर नागपूरसह काही जिल्ह्यांमध्ये मात्र तापमान जास्त असल्याची नोंद आहे. 

तिथं यवतमाळ जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून लवकरच या भागात मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतीची मशागत केली जात आहे. मान्सूनपूर्व पावसामुळे या भागातील वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. राज्यात मान्सूनसाठी पूरक वातावरण असतानाच देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये मात्र हवामानाची विचित्र स्थिती पाहायला मिळत आहे. 

उत्तर भारतातील उष्णतेची लाट कायम असून अनेक ठिकाणी तापमान 40 अंशांच्याही पलिकडे गेलं आहे. दिल्लीमध्ये तापमान 43.8 अंश, प्रयागराज येथे 47.1 अंश आणि वाराणसीत 45.3 अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे.