Maharashtra Winter Session 2022 : नागपूर येथे सुरु असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस वादळी ठरला आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना विविध मुद्द्यांवरुन घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र मंत्र्यांनीही विरोधकांच्या प्रश्नांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मात्र यावेळी माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि शिंदे गटातील मंत्री शंभुराज देसाई (shambhuraj desai) आणि गुलाबराव पाटील (gulabrao patil) यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. आदित्य ठाकरे यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना शिंदे गटातील मंत्री चांगलेच संतापले होते.
रस्ते सुरक्षाबाबतीत चर्चा सुरु असताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विचारलेल्या प्रश्नाला अनुसरुन आदित्य ठाकरे यांनी संबंधित मंत्र्यांना प्रश्न विचारले. "शहरात चुकीच्या बाजूने वाहने चालवण्याचे प्रमाण वाढले आहे. यासोबत राष्ट्रीय महामार्गावर कोणतीही शिस्त न पाळता वाहने चालवली जातात. यावर नुसती दंडात्मक कारवाई न करता तात्काळ जागेवर कारवाई करावी," अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.
यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदारांना चिमटा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र हे प्रकरण हमरीतुमरीवर आले. "मागच्या दोन तीन महिन्यांमध्ये मुंबई सुरत रस्त्यावरुन 40 लोक दिवसा आणि रात्री पळून जात होते. त्या रस्त्याची गुणवत्ता एकदा या सरकारने चेक करावी. मग, पळता येत, धावता येत आणि तिथून गुवाहाटीला सुद्धा जाता येतं," असा खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.
आदित्य ठाकरेंनी सूरतच्या रस्त्यांची धास्ती घेतली - शंभूराज देसाई
यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी, "विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मांडलेले मुद्दे आदित्य ठाकरेंनी परत उपस्थित केले. विरोधी पक्षनेत्यांना उत्तर दिलं, तेच त्यांनाही माझं उत्तर आहे. पण, सुरतच्या रस्त्याची खूपच धास्ती आदित्य ठाकरेंनी घेतली आहे. शिल्लक सेनेत राहिलेल्यांना त्या रस्त्याचा वापर करायला लागू नये. एवढी काळजी त्यांनी घ्यावी," असे प्रत्युत्तर दिलं.
अजित पवार यांचा हस्तक्षेप
संबधित मंत्र्यांऐवजी शंभुराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिल्याने अजित पवारही संतापल्याचे पाहायला मिळाले. "शंभुराज देसाईंना मंत्री म्हणून उत्तर देण्याचा अधिकार आहे. मात्र विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देणे मंत्र्यांचं काम आहे. सभागृह चालविण्याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांची आहे," असे अजित पवार म्हणाले.
गुलाबराव पाटील संतापले
यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनीही या वादात उडी घेतली. "विरोधी पक्षानेत्यांनी विचारलेला प्रश्न आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला. सुरत आणि गुवाहाटीवरून चर्चा करायची असेल, तर यांना मातोश्रीचे रस्ते कसे होते, कसे झाले हे दाखवतो. तुम्ही सुरतला कसे गेले, गुवाहाटीला कसे गेले, हे बोलण्याची गरज नाही. आता तुमचा विषय संपलाय," अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.