Maharastra Politics : ना मुंडे ना महाजन, महाराष्ट्रात भाजपचं कमळ रुजवणाऱ्या पर्वाचा अस्त?

Munde Mahajan Politics : महाराष्ट्रात मुंडे आणि महाजन ही भाजपमधील दोन दिग्गज घराणी.. मुंडे महाजनांनंतर त्यांच्या मुली संसदेत होत्या.. मात्र 2024 च्या निवडणूकीत मात्र या दोन्ही कुटुंबातील कोणाही संसदेत नसणार आहे. पाहुया स्पेशल रिपोर्ट

सौरभ तळेकर | Updated: Jun 5, 2024, 08:42 PM IST
Maharastra Politics : ना मुंडे ना महाजन, महाराष्ट्रात भाजपचं कमळ रुजवणाऱ्या पर्वाचा अस्त?  title=
Maharastra Munde Mahajan Left Out from center politics

BJP Maharastra Politics : राज्यात भाजपला तळागाळात आणि घराघरात पोहोचवण्याचं काम केलं ते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी...  मुंडे महाजन बोलतील तो महाराष्ट्र भाजपमध्ये अंतिम शब्द होता. महाजन कधी राज्यसभेत तर कधी लोकसभेत निवडून गेले. तर गोपीनाथ मुंडे 2014 ला लोकसभेत निवडून गेले. गोपीनाथ मुंडेंच्या अपघाती निधनानंतर त्यांची कन्या प्रीतम दोन वेळा लोकसभेवर निवडून गेल्या. मात्र 2024 मध्ये मुंडे महाजन कुटुंबातील कोणीही सदस्य संसदेत नसणार आहे.

मुंडे आणि महाजन यांच्या निधनानंतर त्यांच्या लेकींनी विजय साकारत आपले पारंपरिक मतदारसंघ राखले होते. मात्र यंदा प्रीतम मुंडे यांच्याऐवजी भाजपने बीडमधून पंकजांना उमेदवारी दिली. तिथे पंकजा मुंडेंना पराभव स्विकारावा लागला. तर पूनम महाजन यांचं तिकीट कापत भाजपने उत्तर मध्य मुंबईमधून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली होती.

पंकजांचा पराभव झाल्याने आणि पूनम महाजनांचं तिकीट कापल्याने आता संसदेत या दोन्ही परिवारातील कोणीही नसणार आहे. पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, पूनम महाजन या तिघी सख्ख्या आत्ते-मामे बहिणी एकाच वेळी संसदीय राजकारणातून दूर झाल्या आहेत. त्यामुळे आता मुंडे महाजन पर्व संपुष्टात आलं की काय? असा सवाल विचारला जात आहे. 

जेव्हा 2014 साली देशात मोदी लाट होती, त्या काळात 33 वर्षीय पूनम महाजन यांना उत्तर मध्य मुंबईतून पहिल्यांदाच उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी महाजन यांनी प्रिया दत्त यांचा 1.86 लाखांनी तर नंतर 2019 च्या निवडणुकीत 1.30 लाखांनी पराभव केला. भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणात महाजन यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिल्यास त्यांच्या विजयाची शक्यता कमी वाटत असल्याने त्यांचं तिकीट कापलं गेलं होतं. तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांना पराभव स्विकारावा लागल्याने आता मुंडे आणि महाजन नाव संसदीय राजकारणातून खोडलं गेलं आहे.