Rohit Sharma: आम्ही कधीही बहाणा...; अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यापूर्वी असं का म्हणतोय रोहित शर्मा?

Rohit Sharma on World Cup Super 8 Match: टीम इंडियाचा पहिला सामना 20 जून रोजी अफगाणिस्तानशी होणार आहे. त्यानंतर 22 जून रोजी बांगलादेशाविरूद्ध आणि 24 जून रोजी ऑस्ट्रेलियाशी सामना रंगणार आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Jun 19, 2024, 07:59 AM IST
Rohit Sharma: आम्ही कधीही बहाणा...; अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यापूर्वी असं का म्हणतोय रोहित शर्मा? title=

Rohit Sharma on World Cup Super 8 Match: टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने चांगली कामगिरी केली आहे. आजपासून या स्पर्धेत सुपर 8 च्या सामन्यांना सुरुवात होणार असून टीम इंडियाचा गुरुवारी अफगाणिस्तानशी सामना रंगणार आहे. सुपर 8 च्या राऊंडमध्ये टीम इंडियाला 5 दिवसांच्या आत 3 सामने खेळायचे आहे. यामुळे आता टीम इंडियाचं शेड्यूल फार व्यस्त आहे. 

टीम इंडियाचा पहिला सामना 20 जून रोजी अफगाणिस्तानशी होणार आहे. त्यानंतर 22 जून रोजी बांगलादेशाविरूद्ध आणि 24 जून रोजी ऑस्ट्रेलियाशी सामना रंगणार आहे. सुपर 8 च्या सामन्यांपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये कर्णधार रोहित म्हणाला, 'पहिला सामना खेळल्यानंतर आम्ही पुढील दोन सामने तीन किंवा चार दिवसांच्या अंतराने खेळणार आहोत. हे थोडं हेक्टिक होणार आहे. परंतु आपल्याला या सर्वांची सवय आहे. आम्ही खूप प्रवास करतो आणि खूप खेळतो त्यामुळे ते कधीही बहाणा होणार नाही.

टीम इंडियाने सोमवारी प्रॅक्टिस सेशनमध्ये सहभाग घेतला. यामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा या खेळाडूंनी अधिक वेळ नेट्समध्ये घालवला. रोहितच्या म्हणण्यानुसार, काहीतरी खास करण्याची उत्सुकता टीममध्ये आहे. दुसरा टप्पा सुरू करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. प्रत्येकजण काहीतरी वेगळं करू इच्छितात आणि आम्ही आमच्या कौशल्य सत्रांना खूप गांभीर्याने घेतो. 

रोहित शर्मा पुढे म्हणतो की, आम्ही या ठिकाणी बरेच सामने खेळले आहेत. त्यामुळे निकाल आमच्या बाजूने यावा यासाठी काय करावे लागेल हे प्रत्येकाला माहिती आहे. 

पीचमुळे रोहित शर्मा होता चर्चेत

अमेरिकेतील ग्रुप स्टेज मॅचेसमध्ये लो स्कोअरिंग सामने पहायला मिळाले. अमेरिकेतील मैदानावर फलंदाज मोकळेपणाने खेळू शकले नाही. मात्र या उलट वेस्ट इंडिजमध्ये पीचची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्येही या काळात बदल निश्चित मानले जातायत. टीम इंडिया बार्बाडोसमध्ये सराव करत असून कर्णधार रोहित शर्माने याआधीच पीचबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. यावेळी रोहितने टीमचा अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराहला यासंदर्भात प्रश्न विचारला. रोहितने जसप्रीत बुमराहला विचारलं, 'पीच कसं आहे?' यावेळी बुमराह प्रॅक्टिससाठी देण्यात आलेल्या पीचबाबत समाधानी असल्याचं समोर आलं.

अफगाणिस्तानविरूद्ध टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग 11

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग.