Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केलं होतं. आज आंदोलनाचा सहावा दिवस आहे. अशातच सरकारने जरांगे यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला होता. अशातच मनोज जरांगेंनी सरकारचा प्रस्ताव फेटाळलाय. ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत, फक्त त्यांनाच नव्हे तर सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, या मागणीवर जरांगे ठाम आहेत. ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं, अशीच जरांगेंची मागणी आहे. मात्र, दुसरीकडे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत. त्यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केला आहे.
जाळफोळीला माझं समर्थन नाही. हिंसाचार थांबवला नाही तर मला नाईलाजाने निर्णय घ्यावा लागेल. बहुतेक मला असं वाटतंय की हिंसाचार करणारे सत्ताधारी असतील. त्यांच्यात हाताने जाळून घेतली अन् मराठ्यांच्या आंदोलनाला डाग लावतील, अशी शंका मला वाटलीच होती. बऱ्याचदा आंदोलन चिघळण्याचं काम केलं जातं. मात्र, आरक्षण मिळेपर्यंत सर्वांनी शांततेत आंदोलन करावं,
हिंसाचाराचा हा कार्यक्रम सत्ताधाऱ्यांचा असणार, हे मला शंभर टक्के माहिती होतं. सर्वांना शांतता पाळावी, माझी ही सर्वांनाच विनंती आहे. तुमचा लेक म्हणून, तुमचा भाऊ म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की, सर्वांनी शांततेत आंदोलन करावं, अशी विनंती मनोज जरांगे यांनी केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी पाणी पिण्याचं आव्हान केलं आहे. त्यांनी मला पत्र देखील पाठवलंय. त्यामुळे मी आता ग्लासभर पाणी पितोय. माझी विनंती आहे की, हिंसाचार बंद करा, हिंसाचार करणारे आपले नाहीत, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाला समर्थन देत भाजपचे गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. तर माजलगावचे आमदार प्रकाश सोलंकी यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर सुरक्षेत वाढ करण्यात आलीये. तसेच राष्ट्रवादीचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भूजबळ यांच्या घराची सुरक्षा व्यवस्था वाढवली. तर दुसरीकडे बीड बंदची हाक मराठा संघटनांकडून देण्यात आली आहे.