महाराष्ट्रातील पहिले दृष्टीहीन गोविंदा पथक! यंदाच्या दहीहंडीला रचणार नवा विक्रम

Maharashtra's First Blind Govinda Pathak : महाराष्ट्रातील पहिलं दृष्टीहीन गोविंदा पथक... दहीहंडीला रचणार नवा विक्रम

दिक्षा पाटील | Updated: Aug 18, 2024, 01:19 PM IST
महाराष्ट्रातील पहिले दृष्टीहीन गोविंदा पथक! यंदाच्या दहीहंडीला रचणार नवा विक्रम title=
(Photo Credit : PR Handover)

Maharashtra's First Blind Govinda Pathak : दृष्टीहीन व्यक्तीचं आयुष्य फार कठीण असतं असं म्हणतात. त्यांना त्यांच्या आयुष्यात अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना हे सुंदर जग पाहता येत नाही आणि त्यातही दृष्टी असणाऱ्यांप्रमाणे ते सगळ्या सणांचा आनंद घेऊ शकत नाही असं म्हणतात. पण आता हे सगळं बदलल्याचं म्हणता येईल. त्याचं कारण नयन फाऊंडेशन आहे. 'लोग साथ आ गए और कारवां बनता गया..,' यावरून नयन फाऊंडेशनची बांधणी झाली. दृष्टीहीन तरुण-तरुणीच्या अंधःकार आयुष्यात किमान काही दिवस निसर्गरम्य भटकंतीने आनंदाचा प्रकाश देता यावा, याची जबाबदारी नयन फाऊंडेशनने स्वीकारली. ही पार पाडत असताना भिन्न विचारसरणीचे तरुण स्वयंसेवक म्हणून पुढे आले. नयनच्या छताखाली एकवटल्याने फाऊंडेशन एक तप पूर्ण करून वाटचाल कायम राखली आहे. 

दृष्टीहीन आणि अंशतः दृष्टीहीन तरूणाना ट्रेकिंग करता यावी, या साध्या-सोप्या उद्देशासाठी फाऊंडेशननं काम सुरू केलं. महाराष्ट्र दिनी अर्थात 1 मे 2010 मध्ये नयनफाऊंडेशनची स्थापना झाली. ट्रेकिंगनंतर, बुध्दीबळ स्पर्धा, योग प्रात्यक्षिके अशी कार्यक्रमांची आखणी केली. 

सन 2013 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका नगरसेवकाच्या आयोजित दहीहंडी उत्सवात नयन फाऊंडेशनने पहिल्यांदा मानवी थर रचले. दृष्टीहिनाचे साडे तीन थर रचत नयन फाऊंडेशन गोविंदा पथकाचा नारळ वाढवला. 2017 मध्ये तरुणीनी थर रचण्यास सुरुवात केली. 2019 मध्ये नयनच्या दृष्टीहीन तरुणानं पहिल्यादा पाच कडक थर रचत सलामी दिली, असे संस्थेचे अध्यक्ष पोन्न अलगर देवेंद्र यांनी सांगितले. पोन्न अलगर हे स्वतः अंशतः दृष्टीहीन आहेत.

रुईया महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संस्थेचे स्वयंसेवक आहेत. यामुळे रुईया नाका/ पार्किंग येथेच फाऊंडेशनच्या बैठका पार पडतात. दडकर मैदानात दहीहंडीचा सराव होतो. अंध विद्यार्थ्यांना परीक्षेत रायटर्स पुरवणे, तरुणांसाठी क्रिकेटचे सामने, तरुणीना स्वसंरक्षणासाठी प्राथमिक तायक्वांदो प्रशिक्षण असे उपक्रम संस्थेनं राबवली आहेत.

हेही वाचा : 'ऑडिशन्स देऊनही काम देत नव्हतं'; स्ट्रगलविषयी बोलताना दिसली श्रद्धा कपूर; मात्र चर्चा राजुकमार रावच्या प्रतिक्रियेची

दहीहंडी उत्सवातील बक्षीस रक्कमेचा एक वाटा दृष्टीहीन / अंशतः दृष्टीहीनांना समान वाटला जातो. दुसऱ्या वाट्यातून गोविंदाना ट्रेकिंगला घेऊन जाण्यात येतं.  गड-किल्ल्यावर ट्रेकिंग करण्याचा अट्टाहास फाऊंडेशनच्या तरुणांचा असतो. भविष्यात स्वयंसेवकांच्या मार्गदर्शनात दृष्टीहीनाचा हात हातात घेऊन विविध सामाजिक उपक्रमानं सामाजिक भान जपण्याचा मानस संस्थेचा आहे.