महाराष्ट्रातील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण

महाराष्ट्रातील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Updated: May 24, 2020, 08:56 PM IST
महाराष्ट्रातील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : महाराष्ट्रातील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाविकासआघाडी सरकारमधला हा मंत्री काँग्रेसचा एक ज्येष्ठ नेता आहे. या मंत्र्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून हा मंत्री होम क्वारंटाईन होता. 

महाविकासआघाडीमधला आत्तापर्यंत दुसरा मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे मंत्रिमंडळात काहीसं चिंतेचं वातावरण आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांसह राज्यातील इतर मंत्री योग्य ती खबरदारी घेताना दिसत आहेत. यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठका किंवा इतर बैठका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पाडल्या जात आहेत. तर प्रत्यक्ष होणाऱ्या बैठकीमध्येही कमी उपस्थिती आणि योग्य ते अंतर पाळलं जात आहे. एवढं करूनही मंत्रिमंडळातील दोन मंत्री कोरनाग्रस्त झाले, यामुळे खळबळ उडाली आहे. 

जितेंद्र आव्हाड यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता, तेव्हा स्वत: मुख्यमंत्र्यांनी त्यांना योग्य उपचार मिळतील याची काळजी घेतली होती. कोरोना झाल्यामुळे जितेंद्र आव्हाड हे काही दिवस रुग्णालयात होते. कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्यानंतर आव्हाड यांना घरी सोडण्यात आलं.

जितेंद्र आव्हाडांनी कोरोनावर मात केली असली तरी डॉक्टरांनी त्यांना एक महिना सक्तीची विश्रांती घ्यायला सांगितली आहे. या काळात मला कोणीही भेटायला येऊ नये, असं आवाहन आव्हाड यांनी केलं. आव्हाड यांच्यावर मुलुंडच्या खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.