महावितरणचा बिलातील स्थिर आकार ३ महिन्यांसाठी स्थगित

ग्राहकांना मोठा दिलासा 

Updated: Apr 13, 2020, 08:49 AM IST
 महावितरणचा बिलातील स्थिर आकार ३ महिन्यांसाठी स्थगित

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे लॉकडाऊनची मर्यादा वाढवण्यात आली. ३० एप्रिल २०२० पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आलं. लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यामुळे राज्यातील अनेक उद्योग धंदे आणि व्यवसाय बंद केलेले आहेत. यामुळे बंद असलेल्या औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांच्या वीजबिलातील स्थिर मागणीला पुढील ३ महिन्यांसाठी स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे महिवतरणकडून लॉकडाऊननंतर येणाऱ्या बिलात कोणताही दंड आकारला जाणार नसल्याची ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. 

लॉकडाऊनच्या कालावधीतील वीजबिलातील स्थिर आकार माफ करण्यात यावा, अशी मागणी अनेक औद्योगिक तसेच वाणिज्यिक ग्राहकांनी केली होती. ही मागणी मान्य करून डॉ. नितीन राऊतांनी ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. महत्वाचे म्हणजे ग्राहकांचे मीटर रीडिंग उपलब्ध नसल्यास सरासरी वीजबिल आकारण्यात येणार आहे. मे २०२० मध्ये एएमआरमार्फत बिलाची माहिती उपलब्ध झाल्यानंतर वास्तविक मीटर रीडिंगनुसार वीजबिल आकारण्यात येणार आहे.  

लॉकडाऊनच्या कालावधीत कुठल्याही प्रकारचा वीजवापर झाला नसल्याचे समजून लॉकडाऊनच्या कालावधीतील शून्य वापराचे वीजबिल देण्यात येणार आहे, असे सांगून ऊर्जामंत्री डॉ राऊत म्हणाले की, अशा ग्राहकांचे मीटर रीडिंग मिळाल्यानंतर या ग्राहकांना लॉकडाऊनच्या कालावधीत नोंदविलेल्या वास्तविक वापराचे वीजबिल देण्यात येईल.