अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, सरकार संपूर्णपणे पाठीशी - अजित पवार

Major loss to farmers due to rains : राज्यात विदर्भ, मरावाडा आणि उत्तर महाराष्ट्रात कोसळलेल्या मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.  

Updated: Sep 30, 2021, 02:15 PM IST
अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, सरकार संपूर्णपणे पाठीशी - अजित पवार title=

मुंबई, औरंगाबाद, नागपूर, लातूर : Major loss to farmers due to rains : राज्यात विदर्भ, मरावाडा आणि उत्तर महाराष्ट्रात कोसळलेल्या मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. संपूर्ण शेत पाण्याखाली गेले आहे. बळीराजाचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतात पिकलंच नाही तर शिक्षण कसं घ्यायचं, असा प्रश्न नुकसाग्रस्त शेतकऱ्याला पडला आहे. शेतकऱ्यांच्या लेकरांच्या व्यथा 'झी 24 तास'वर व्यक्त केली आहे. दरम्यान, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या संपूर्णपणे पाठीशी असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. (Major loss to farmers due to rains, Maharashtra government will help farmers - Ajit Pawar)

अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे आणि याच परिणाम शहरात शिकणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांवर होताना दिसत आहेत, आता या मुलांनाही खावे कसे आणि जगायचे कसे असा प्रश्न विचारलाय, आधीच पैसे येणे कठीण होते आता तर घरीच जावी लागेल अशी भीती विद्यार्थी व्यक्त करत आहेत. 

लातूर जिल्ह्यातील पूरस्थितीचा सर्वाधिक फटका हा शेतीपिकांना बसलाय. निलंगा तालुक्यातील चिचोंडी एका शेतकऱ्याने शेतात घुसलेल्या पुराच्या पाण्यात जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. धर्म बिराजदार असे या शेतकऱ्याचे नाव आहे. आपल्या स्वतःच्या शेतातील 5 एकर ऊस आणि 3 एकर सोयाबीनमध्ये पुराचे पाणी घुसले होते. 

जायकवाडीतल्या विसर्गामुळे गोदाकाठची गावं पाण्याखाली गेलीयत. बीड जिल्ह्यातलं शनी मंदिर आणि पांचळेश्वरचं दत्त मंदिर पाण्याखाली गेलं. विसर्ग आणखी वाढवला तर गोदेची पातळी आणखी वाढेल. गेवराईच्या प्रशासनाचं मात्र इकडे लक्षच नाहीये.  

वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे जवळपास दीड लाख हेक्टर पिकांचं नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावलाय. कपाशीची बोण्ड सडून त्यात अळ्या पडल्या. तर सोयाबीन शेंगांना अंकुर फुटलेत. अति पावसामुळे तूरीला उधळी लागून पिक वाळून गेलंय. उडीद, मुगाची निम्मी काढणी उरकली होती. तर  सोयाबीन, तूर, कपाशीतून उत्पन्नाची मोठी आशा होती पावसानं निफाड तालुक्यातही शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. द्राक्ष बागांमध्ये पाणी साचलं. त्यामुळे बागांवर डाऊनी, भुरी रोग पडू शकतो. कोरोनानं द्राक्षविक्रीला आधीच फटका बसलाय, त्यात आता पावसानं दगा दिला. 

राज्य सरकार शेतकऱ्याच्या पाठिशी - अजित पवार

दरम्यान, सरकार शेतकऱ्यांच्या संपूर्णपणे पाठीशी असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. पालकमंत्री पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर असल्याचंही ते म्हणाले. मदतीबाबत केंद्र सरकारनं दुजाभाव करू नये असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. 

21 जिल्ह्यांत 28 लाख हेक्टरवरील शेतीचे नुकसान

21 जिल्ह्यांत 28 लाख हेक्टरवरील शेतीचं नुकसान झाल्याची माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. या नुकसानीचे  तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिल्याचं ते म्हणाले. पावसामुळे पंचनामे करण्यात अडचणी येत असल्याचं त्यांनी सांगीतलं.  मदतीच्या निकषांमध्ये वाढ झाली पाहिजे असंही दादा भुसे म्हणाले. 

जवळपास 81 टक्के पंचनामे पूर्ण

जवळपास 81 टक्के पंचनामे पूर्ण झाले असून पावसाचा जोर ओसरल्यानंतर पंचनाम्यांचं काम पूर्ण होईल असी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांनी दिलीये. शेतक-यांना राज्य सरकार मदत करेलच मात्र केंद्र सरकारनंही मदत करावी असं आवाहन त्यांनी केले.