महिन्याभरात दोन सख्या भावांचा डेंग्यूमुळे मृत्यू

कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला 

Updated: Dec 14, 2019, 10:50 AM IST
महिन्याभरात दोन सख्या भावांचा डेंग्यूमुळे मृत्यू title=

कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये महिन्याभरात दोन सख्या भावांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. मणियार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या मृत्यूला जबाबदार कोण? असा सवाल उभा केला जात आहे. 

अवघ्या चार वर्षांचा उजेड हमीद मणियार गेले काही दिवस तापाने फणफणत होता. अखेर आज त्याचा संघर्ष संपला आणि त्याने जगाचा निरोप घेतला. दुर्देव म्हणजे गेल्याच महिन्यात त्याच्या 9 महिन्यांच्या भावाने अदनान हमीद मणियार याचा ही मृत्यू झाला होता. दोघांच्या मृत्यूमुळे मणियार कुटुंबियांवर शोककळा पसरलीय. या दोघांचा मृत्यू डेंग्यूमुळे झाला असून या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. तर नागरिकांनीही याबाबत संताप व्यक्त केलाय.

या घटनेबाबत आरोग्य विभाग अधिकाऱ्यांकडून माहिती मागण्याचा प्रयत्न केला असता अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती नसल्याचं दिसून आलं. अखेर काही वेळाने या आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती मिळाली आणि डेंगून मृत्यू झाल्याचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितली.  

महापालिकेला डेंग्यू निर्मूलनासाठी लाखो रुपयांचा निधी मिळत असताना ही त्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होतंय हेच यावरून दिसून येतंय..तपास करून डेंग्यूंने मृत्यू झाल्याचं शिक्कामोर्तब होईलही. मात्र गेलेला जीव मात्र कोणी परत आणून देऊ शकत नाही. मणियार कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखाच्या डोंगराला कोण जबाबदार असा सवाल सामान्यांकडून विचारला जात आहे. 

 परिसरात काही महिन्यांपूर्वी जुने पिण्याच्या पाण्याचे पाईप काढून, नवीन पाईप लाईन टाकण्यात आली. परंतु, जुने पाईप मात्र तसेच ठेवण्यात आल्याने पाण्याचे डबके साचून डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होत असल्याची तक्रार नागरिकांची आहे. शिवाय अनेक ठिकाणी ड्रेनेजचे पानी रस्त्यांवर आल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे.