'सरांच्या निधनाने महाराष्ट्राच्या...', मनोहर जोशींच्या निधनाने गडकरी भावूक; हळहळून म्हणाले, 'कुटुंब...'

Manohar Joshi Death Political Leaders Paid Tribute: महाराष्ट्रातील पहिली बिगरकाँग्रेसी मुख्यमंत्री ठरलेल्या मनोहर जोशींसंदर्भातील आठवणींना भारतीय जनता पार्टीमधील अनेक बड्या नेत्यांनी उजाळा दिला आहे. जोशींच्या निधनाने कधीही न भरुन येणारी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 23, 2024, 08:55 AM IST
'सरांच्या निधनाने महाराष्ट्राच्या...', मनोहर जोशींच्या निधनाने गडकरी भावूक; हळहळून म्हणाले, 'कुटुंब...' title=
गडकरींनी जागवल्या आठवणी

Manohar Joshi Death Political Leaders Paid Tribute: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचं वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं आहे. गुरुवारी रात्री हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना हिंदुजा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान पहाटे 3 वाजता मनोहर जोशींचं निधन झालं. मनोहर जोशींच्या निधनानंतर अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही सोशल मीडीयावरुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मनोहर जोशींना श्रद्धांजली वाहिली आहे.

राऊतांनी पोस्ट केला फोटो

मनोहर जोशींचा फोटो पोस्ट करत संजय राऊत यांनी, "शून्यातून विश्व निर्माण करणारे.. कडवट महाराष्ट्र अभिमानी, अखेरच्या श्वासापर्यंत शिवसैनिक म्हणून जगलेल्या मनोहर जोशी यांना विनम्र अभिवादन!" अशी कॅप्शन देत श्रद्धांजली वाहिली आहे.

फडणवीसांनी जागवल्या आठवणी

"महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष श्री मनोहर जोशी यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. माझा त्यांचा वैयक्तिक ऋणानुबंध होता," असं फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. "नगरसेवक ते महापौर, आमदार ते मुख्यमंत्री आणि खासदार ते लोकसभाध्यक्ष असे सर्व टप्पे त्यांनी आपल्या राजकीय जीवनात पूर्ण केले. विधानसभा आणि विधानपरिषद, लोकसभा आणि राज्यसभा अशा चारही सभागृहात प्रतिनिधीत्त्व करण्याचा मान त्यांनी मिळविला. अतिशय शिस्तबद्ध, संयमी आणि अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख होती. वैयक्तिक जीवन असो की राजकीय जीवन वेळेची शिस्त त्यांनी कधी सोडली नाही," असं म्हणत फडणवीस यांनी जोशी यांच्या आठवणींन उजाळा दिला.

नक्की वाचा >> मनोहर जोशी म्हणालेले, 'राज आणि उद्धव एकत्र आले तर महाराष्ट्रात...'

"महाराष्ट्राच्या राजकीय-सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे योगदान कधीच विस्मरणात जाणार नाही. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे," असं फडणवीस म्हणाले.

गडकरी हळहळले

"महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नेते मनोहर जोशी सरांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले. सरांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरवला," असं म्हणत गडकरींनी हळहळ व्यक्त केली आहे. "अतिशय नम्र, हजरजबाबी आणि महाराष्ट्र तसेच मराठी माणूस यांच्याविषयी मनापासून तळमळ असलेला नेता आपण गमावला आहे. युती सरकारच्या काळात जोशी सरांच्या नेतृत्वाखाली मला काम करण्याची संधी मिळाली. कुटुंब प्रमुखाप्रमाणेच कायम त्यांचे मार्गदर्शन लाभले," असं गडकरींनी जोशींच्या आवणींना उजाळा देताना म्हटलं आहे.

नक्की वाचा >> पवार-ठाकरे मैत्रीमुळे मनोहर जोशी झालेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री; 'त्या' सल्ल्यानं नशीब पालटलं

आपल्या पोस्टच्या शेवटी फडणवीसांनी, "ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्याची शक्ती देवो," असं म्हटलं आहे.

पोकळी कधीही भरून निघणार नाही

महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही सोशल मीडियावरुन मनोहर जोशींना श्रद्धांजली अर्पण केली आहे. "महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष श्री मनोहर जोशी यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक सुसंस्कृत, अनुभवी नेता गमावला आहे. जोशी सरांच्या जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो ही प्रार्थना," असं बावनकुळेंनी म्हटलं आहे.

नगरसेवक ते लोकसभा अध्यक्ष

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मनोहर जोशींना प्रेमाने 'जोशी सर' म्हटले जायचे. जोशी यांनी 1970 च्या दशकात शिवसेनेकडून विधान परिषदेवर निवडून येऊन आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. 1976 ते 1977 या काळात ते मुंबईचे महापौरही होते. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते जोशी हे 4 वर्षे (1995-1999) शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री होते, जेव्हा पक्षाने भाजपासोबत युती करून महाराष्ट्रात सत्ता मिळवलेली. त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या कार्यकाळात मनोहर जोशी यांनी लोकसभा अध्यक्ष (2002-2004) म्हणून काम केले होते. जोशी हे मुंबई सेंट्रल मतदारसंघातून खासदार राहिले आहेत. राज्यसभेचे खासदार म्हणूनही त्यांनी 6 वर्षे काम केले.