मला घेरण्याचा प्रयत्न केला जातोय, मी एकटा पडलोय; मनोज जरांगे पाटील असं का म्हणाले?

Manoj Jarange Patil: मला आणि माझ्या समाजाला घेरण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. आम्ही जी सत्य मागणी केली ती अनेकांना रुचलेली नाहीये. मी एकटा पडलोय, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 24, 2024, 11:57 AM IST
मला घेरण्याचा प्रयत्न केला जातोय, मी एकटा पडलोय; मनोज जरांगे पाटील असं का म्हणाले? title=
Manoj Jarange Patil press conference attack on maratha and obc leaders over reservation

Manoj Jarange Patil: मला आणि माझ्या समाजाला घेरण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. आम्ही जी सत्य मागणी केली ती अनेकांना रुचलेली नाहीये. मी एकटा पडलोय, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. आज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी ओबीसी नेत्यांबरोबरच मराठा नेत्यांवरही निशाणा साधला आहे. मराठ्यांचे नेते मतांचा विचार करतात आरक्षणाचा नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. 

'आम्ही सत्य बोलतो, कायद्याने मराठ्यांना आरक्षण दिलं आहे. सरकारी नोंदी आहेत. मराठा हा कुणबी असल्याचा उल्लेख आहे.मी नेमकं महत्त्वाच्या विषयावर बोट ठेवल्याने सगळ्यांना पोटदुखी होऊ लागले. हा मुलगा जो पर्यंत या लढ्यात आहे तोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळून देणार आहे. सत्यता बाहेर आली आहे.  मराठ्यांच्या जीवावर निवडून येणारे ओबीसी नेते आता  मराठा समाजासमोर उघडे पडले आहेत,' असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

'महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आणि मराठे नेत्यांना सांगतो  सगळ्या पक्षातीले ओबीसी नेते मराठा समाजाला आरक्षण मिळू नये ते एकटवले आहेत. ते मतांचा विचार नाही तर आरक्षणाचा विचार करायला लागले आहेत. त्याउलट मराठ्यांचे नेते आरक्षणाचा नाही तर मतांचा विचार करत आहेत. हा फरक आहे त्यांच्यात आणि मराठ्यांच्या नेत्यांमध्ये. आरक्षण विषय इतका मोठा आहे त्यांच्यासाठी की मतं आणि निवडून येणे महत्त्वाचं नाहीये त्यांच्यासाठी,'  असंही त्यांनी म्हटलं आहे.

'भाजपामधले ओबीसींची सर्व नेते आमदार , मंत्री एकत्र झाले. राष्ट्रवादी, शिंदे गटाचे, पवार गटाचे तर, विरोधी पक्षातील सर्व ओबीसी नेते एकत्र आले आहेत. सर्व ओबीसी नेते एकटवले आहेत आणि मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यायचे नाही. पण हेच मराठ्यांच्या नेत्यांना समजत नाही का आरक्षण किती मोठं आहे. ओबीसी नेते पदाला आणि मताला किंमत द्यायला तयार नाहीत. याचा अर्थ तुम्हाला कळतंय का आरक्षण किती महत्त्वाचं आहे. मराठ्यांची जात किती मोठी होईल, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.

'आणखी एक सांगतो मराठा समाज आणि मराठ्यांच्या नेत्याला सांगतो मी एकटा पडलोय. मी आरक्षणाच्या बाजूने राहू नये म्हणून सगळ्यांनी मला घेरलं आहे. मी एकटा पडलोय. मग सत्ताधाऱ्यांचे मराठ्यांचे मंत्री तेही कोणी बोलत नाही असो किंवा विरोधी पक्षातील नेतेही बोलत नाही. मराठा समाजाला माझी विनंती आहे तुम्ही एकजूट राहा,' असं अवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे. 

'मराठ्यांच्या नेत्याने ताकदीने उभं राहा. 6 जुलै ते 13 जुलैपर्यंत जे मराठा आरक्षण रॅली ठेवली आहे. त्याला सर्वांनी उपस्थित राहा. 6 जुलैला एकही मराठा घरी राहणार नाही सगळे जणांनी आपल्या परिसरात जिथे कुठे जनजागृती शांतता मराठा आरक्षण रॅली असेल तिथे उपस्थित राहा,' असं अवाहन जरांगे यांनी केलं आहे.