'सगळं आरक्षण रद्द करा, फक्त..', जरांगेंची मागणी; म्हणाले, '..तर विधानसभेला गुलाल रुसेल'

Manoj Jarange Patil Warning Over Maratha Aarakshan: मनोज जरांगे-पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत हल्लाबोल केला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 23, 2024, 12:16 PM IST
'सगळं आरक्षण रद्द करा, फक्त..', जरांगेंची मागणी; म्हणाले, '..तर विधानसभेला गुलाल रुसेल' title=
जरांगेंनी पत्रकारांशी बोलताना मांडलं मत

Manoj Jarange Patil Warning Over Maratha Aarakshan: 'आम्ही सांगितल्याप्रमाणे सागे सोयऱ्यांची व्याख्या पूर्ण करा. वाशी येथील गुलालाचा आपमान करू नका. नाहीतर तुमच्यावर विधानसभेत गुलाल रुसेल,' असा इशारा मराठा आरक्षणाची मागणी करणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सत्तेत असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारला दिला आहे. तसेच 1994 साली आरक्षणाअंतर्गत घेण्यात आलेल्या 350 जाती कशाच्या आधारावर आरक्षणात घेतल्या गेल्या हे सरकारने स्पष्ट करावे अशी मागणी जरांगेंनी केली आहे. इतक्यावरच न थांबता त्यावेळेस मराठा पोटजात म्हणून का समाविष्ट करुन घेण्यात आली नाही, हे ही सांगावं असं जरांगे म्हणालेत. तसेच मूळ आरक्षण वगळता इतर सर्व आरक्षण रद्द करावं असंही जरांगे म्हणालेत.

काहीही झालं तरी तुम्ही नोंदी नाकारु शकत नाही

सरकारची काय भूमिका आहे किंवा सरकारची बाजू आहे यापेक्षा कायदा काय सांगतो हे सरकारने बघणे महत्वाच आहे, असं जरांगेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उल्लेख करत म्हटलं. "कायदा म्हणतो मराठवाड्यातील मराठा हा कुणबी आहे. रेकॉर्ड तपासायला सुरू करा हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना सांगतो. मी यासाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना विनंती करतो. तुम्ही खोटं आहे ते आरक्षण दिले, खरे आरक्षण दिले नाही. कुणीही आडवे आले तरी सरकारी नोंदी तुम्ही नाकारू शकत नाही," असं जरांगे म्हणाले.

मराठा आणि ओबीसी एक

"1800 काळात औंढ येथे कुणबी होते नंतर ते सरदार मराठा करण्यात आले. मात्र तुम्ही ते पुरावे घेत नाहीत. तुम्हाला नोंदी आणि रेकॉर्ड घेणे गरजेचे असून तुम्ही ते टाळू शकत नाही. जेव्हा जेव्हा राज्यात सभा सुरू झाल्या तेव्हा मी सांगितले की 83 क्रमांकाचा मराठा आणि ओबीसी एक आहेत. 1967 ला आरक्षण दिले होते. त्याचा आधार घेऊन 2004 ला कायदा पारित झाला होता," अशी आठवण जरांगेंनी सरकारला करुन दिली.

सगळं आरक्षण रद्द करा

"ज्या प्रमुख जाती आरक्षणाअंतर्गत घातल्या त्यानंतर ज्या जाती 1994 साली पुन्हा नव्याने आरक्षणात जाती घातल्या तेव्हाच्या 350 जाती नेमक्या कशाच्या आधारे आरक्षणाखाली घेतल्या? याबद्दल विचारलं असता, गिरीश महाजन म्हणाले की, 'मराठा आणि कुणबी वेगळा आहे. त्यांची ती उपजात आणि पोटजात म्हणून घेतल्या.' पण कुणबी यांची पोटजात कुणबी होऊ शकत नाही का? इतर जाती पोटजात म्हणून घातली तर मग मराठा ही पोटजात म्हणून आरक्षणात का घातली नाही?" असा सवाल जरांगेंनी उपस्थित केला. "1994 ला दिलेले आरक्षण रद्द करा. तर कशाच्या आधारावर दिले याचे पुरावे द्या. त्यांचे खूप लाड पुरवले असून आता तुम्ही उत्तरे द्या की तुम्ही त्यांना घेतले कसे?" असा सवाल जरांगेंनी उपस्थित केला. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं मूळ आरक्षण कायम ठेऊन बाकी सारं आरक्षण रद्द करा अशी मागणी जरांगेंनी केली. मुस्लिम आणि ब्राम्हण यांच्या सरकारी नोंदी निघाल्या असून मुस्लिमांना देखील ओबिसीतून आरक्षण मिळायला हवे, असंही जरांगे म्हणाले. "पाशा पटेल यांची ही कुणबी नोंद निघाली, असंही जरांगे म्हणाले. "आम्ही तुम्हाला भाऊ मानले मात्र तुम्ही आमच्या ताटात विष कालवले. पूर्णच आरक्षण रद्द करून टाका फक्त घटनेने दिलेलं आरक्षण ठेवा. ते वगळता वरील 16 टक्के आरक्षण रद्द करून टाका," असं जरांगेंनी म्हटलं आहे.

आचासंहितेचे कारण देऊ नका

"आम्ही सांगितल्याप्रमाणे सागे सोयऱ्यांची व्याख्या पूर्ण करा. वाशी येथील गुलालाचा आपमान करू नका. नाहीतर तुमच्यावर विधानसभेत गुलाल रुसेल," असा इशारा जरांगेंनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे. "मी कोणताही निर्णय एकट्याने घेतला नाही. आमची व्याख्या घेणार नसाल तर आमच्यावर दबावाखाली तुम्ही गेम कराल," अशी भीती जरांगेंनी बोलून दाखवली. "निवडणूक होईपर्यंत राहू द्या नंतर उडवणार असे समजते. मात्र सरकार मला मनोज जरांगे म्हणतात. शेपूट लांबले म्हणू नका शेपूट त्याचे लांबले आहे. निवडणुकीच्या आचासंहितेचे कारण देऊ नका," असंही जरांगेंनी सांगितलं आहे.

कोट्यवधींच्या जाहिराती देता पण मराठ्यांना काही देत नाही

"तुम्ही फक्त कागद वाचता. कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती देतात. मात्र मराठ्यांना काही देत नाही," अशी टीकाही जरांगेंनी केली. "आपण किती ही दिले तरी हे आरक्षण उडवणार आहे. ज्याचं दुकान उठले ते खोड्या करत आहेत. ज्या मराठ्यांना आरक्षण नको आहे त्यांनी इतर मराठ्यांना आरक्षण मिळावे असे म्हणावे," असंही जरांगे म्हणाले.

आम्हाला धोका देऊ नका

"सरकारने दिलेले 10 % आरक्षण उडणार आहे. बिहारचे उडाले तसे सरकारने दिले तर याला जबाबदार कोण?" असा सवाल जरांगेंनी विचारला आहे. "फसवले तर आम्ही छाताडावर बसवून घेऊ. आपलेच लोक माझ्याकडे सुई दाखवून मला बदनाम करण्याचे काम करत आहेत. आम्ही 50 - 55 % असून धोका देऊ नका. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री इकडे कानाडोळा करू नका. नाहीतर राजकारणात उतरु. नंतर आम्ही कुणाला आमचं समजणार नाही. कोल्हापूर येथील सर्व मराठे कुणबी आहेत. मात्र राज्यातील विविध ठिकाणच्या नोंदी दाबून ठेवल्या आहेत," असंही जरांगे म्हणाले.

फडणवीसांना लगावला टोला

"देवेंद्र फडणवीस तुम्ही मागील पाढे वाचणे बंद करा. तो काय तेलाचे तूपाचे डब्बे देतो का? तुम्ही माझ्यावर अन्याय करायला लागलात. तुम्ही आरक्षण देतात मात्र ते सहा महिन्यात उडते. मराठ्यांना सांगता येत नाही छाती ठोकून की आरक्षण दिले आहे, म्हणून तुम्ही दोघे सारखेच आहात," असा टोला जरांगेंनी फडणवीसांना लगावला आहे.

सक्रीय राजकारणात येणार का?

"आम्ही फक्त चाचपणी केली आहे. आम्हाला राजकारणात जायचं नाही. लोकांच्या बदबावामुळे मराठ्यांच्या माना कापणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही. एकाही मतदारसंघाचे नाव आम्ही जाहीर करणार नाही. आमचं आरक्षण आम्हाला द्या आम्हाला राजकारणाची गरज नाही. 13 तारखेला आम्ही निर्णय घेणार की 288 जागा लढवायच्या की नाही?" असं जरांगे पाटील म्हणाले.

थेट इशाराच दिला

"कुणबी प्रमाणपत्र थांबले नाही पाहिजे नाहीतर मराठे त्या कार्यालयावर धडकले म्हणून समजा आता आम्ही कार्यालयात घुसणार," असा इशारा जरांगेंनी दिला आहे. "त्यांचं ऐकले की आमची प्रमाणपत्रं थांबवता. आमची कॅबिनेट घेतली नाही," असं म्हणत जरांगेंनी नाराजी व्यक्त केली.

स्पष्ट निर्णय घेतला तर जातीवाद बंद होईल

"गाड्यावर केळ विकनाऱ्यांना आरक्षण मिळायला हवे आहे. मडके बनवणाऱ्या पण आरक्षण मिळायला हवे. मुस्लिम समाज सगळ्यात जास्त गरीब असून तो गारिगारी (कुल्फी) विकतो, त्यांनीही आरक्षण मिळायला हवं. तुम्ही स्पष्ट निर्णय घेतल्यावर जातिवाद बंद होईल," असं जरांगे सरकारला म्हणाले.

प्रकृतीसंदर्भात काय म्हणाले जरांगे?

"अशक्तपणा आला होता.आता प्रकृती सुधारली आहे. मला आता भेटायला येऊ नका. इकडे येण्याची गडबड करू नका," असं जरांगेंनी आपल्या समर्थकांना सांगितलं आहे.