Kokan Rain Update : मुसळधार पावसाचा जबरदस्त फटका कोकण रेल्वेला बसला आहे. दरड कोसळल्याने कोकण रेल्वे ठप्प झाली आहे. सावंतवाडी, तेजस, जनशताब्दीसह अनेक एक्सप्रेस ट्रेन खोळंबल्या आहेत. कोकण रेल्वेची वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे. रेल्वे वाहतूक थांबल्याने कोकण रेल्वे मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. रेल्वेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून तातडीने दरड हटवण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील खेड- दिवाण- खवटी दरम्यान दरड कोसळली आहे. थेट रेल्वे रुळावर दरड कोसळल्याने खेड- दिवाण- खवटी दरम्यान असलेला रेल्वे बोगदा बंद झाला आहे. कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरु होण्यास अडीच ते तीन तास लागण्याची शक्यता आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने ही माहिती दिली आहे.
विन्हेरे व दिवाणखवटी स्टेशन दरम्यान बोगद्याजवळ ट्रॅकवर माती आल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक बंद झाली आहे. ट्रॅक वरील माती बाजूला करण्याचे काम सुरू आहे. वाहतूक पूर्ववत व्हायला आणखी पाच ते सहा तास लागतील.
चिपळूण, खेडला पाणी भरल्याने कोकण रेल्वेला फटका बसला आहे. कोकण रेल्वे ठप्प झाल्याने अनेक एक्सप्रेस ट्रेन खोळंबल्या आहेत. दुरांतो एक्स्प्रेस माणगाव रेल्वे स्थानकात रखडली आहे. अनेक एक्सप्रेस ट्रेन चार ते पाच तास वेगवेगळ्या स्थानकात उभ्या आहेत. खेड जवळ दिवाणखवटी स्टेशनं जवळ रेल्वे रुळावर माती आल्याने वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. मुंबईकडे जाणारी मांडवी एक्सप्रेस खेड स्थानकात थांबवली आहे. श्री गंगानगर एक्सप्रेस कामथे स्थानकात, तेजस आणि जनशताब्दी एक्सप्रेस रत्नागिरीत, सावंतवाडी दिवा दिवाणखवटी स्थानकात थांबून ठेवण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.