'तुमचे बोलवते धनी भाजप', काँग्रेसचा विनायक मेटेंवर पलटवार

मराठा आरक्षणाच्या उपसमितीच्या अध्यक्षपदावरुन अशोक चव्हाण यांना हटवण्याची मागणी करणाऱ्या विनायक मेटेंवर काँग्रेसने पलटवार केला आहे. 

Updated: Aug 8, 2020, 05:04 PM IST
'तुमचे बोलवते धनी भाजप', काँग्रेसचा विनायक मेटेंवर पलटवार

मुंबई : मराठा आरक्षणाच्या उपसमितीच्या अध्यक्षपदावरुन अशोक चव्हाण यांना हटवण्याची मागणी करणाऱ्या विनायक मेटेंवर काँग्रेसने पलटवार केला आहे. 'मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण सर्वांना विश्वासात घेऊन पावलं उचलत आहेत. त्यांच्या सर्वसमावेशक आणि सावध भूमिकेमुळे मराठा आरक्षणाची बाजू भक्कम होत असून त्यामुळे छुपी कारस्थानं करणाऱ्या मेटेंच्या बोलवते धनी असलेल्या भाजपा नेत्यांच्या पोटात दुखू लागलं आहे,' असं ट्विट काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलं आहे. 

'आज मराठा आरक्षणावर कोणतीही स्थगिती नाही, तसंच वकीलही पूर्वीच्याच सरकारने नेमलेले आहेत. विनायक मेटे धादांत खोटे बोलत आहेत. जनतेची दिशाभूल ते फडणवीसांच्या इशाऱ्यावर करत आहेत. फडणवीसांच्या पायावर घालीन लोटांगण वंदिन चरण म्हणणाऱ्या मेटेंचा खरा भाजपाचा चेहरा मराठा समाज ओळखून आहे,' अशी टीका सचिन सावंत यांनी केली आहे. 

'मराठा आरक्षणासाठी ५० बलिदाने होत असताना, उच्च न्यायालयात फडणवीस सरकारने शपथपत्र दाखल करण्यास ३ वर्ष लावली आणि शिवस्मारकात गैरव्यवहार सुरू असताना गप्प राहणाऱ्या खोटारड्या मेटेंनी मराठा समाजाचा विश्वास स्वत:च केव्हाचा गमावला आहे', असंही सचिन सावंत ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विनायक मेटे आक्रमक झाले आहेत. विनायक मेटे यांच्या नेतृत्वात राज्यभरातल्या ९ मराठा संघटना एकत्र येऊन मराठा समन्वय समिती गठीत झाली आहे. मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावरुन अशोक चव्हाण यांना हटवून एकनाथ शिंदे किंवा दुसऱ्या सक्षम मंत्र्याकडे उपसमितीचे अध्यक्षपद द्यावे, अशी मागणी विनायक मेटेंनी केली आहे. तसंच मराठा आरक्षण मुद्द्यावरुन ९ ऑगस्ट म्हणजेच उद्या आंदोलन करणार असल्याचा इशाराही मेटेंनी दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याला विरोध करणार असल्याचं मेटे म्हणाले.