आरक्षणासाठी भाषण केलं अन् घरी येताच...; धुळ्यात मराठा समन्वयकाचा दुर्दैवी मृत्यू

Maharashtra Reservation : धुळ्यात मराठा आरक्षणासाठी आणखी एकाचा बळी गेलाय. धुळ्यात आंदोलन करत असताना मराठा समन्वयकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे धुळ्यातील मराठा समाज आणखीनच आक्रमक झाला आहे.

आकाश नेटके | Updated: Sep 11, 2023, 10:44 AM IST
आरक्षणासाठी भाषण केलं अन् घरी येताच...; धुळ्यात मराठा समन्वयकाचा दुर्दैवी मृत्यू title=

प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे : मराठा समाजाचा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. आरक्षणप्रश्नी प्रत्येकवेळी राज्य सरकारकडून केवळ आश्वासनं देण्यात येत आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून जालना (Jalna Maratha Protest) जिल्ह्यातल्या अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपोषण करण्यात येत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ राज्यभरात मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात येत आहे. मात्र या आंदोलनामुळे एकाचा बळी गेलाय. धुळ्यात (Dule News) आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मराठा समन्वयकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.

धुळे शहरात मराठा समाजाच्या वतीने राज्य सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येत होते. या वेळी गाजर दाखवून घोषणा देण्यात आल्या. मात्र या आंदोलनादरम्यानच धुळे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजाराम पाटील यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. धुळे शहरातील जेल रोडवर गेल्या चार दिवसापासून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने साकळी उपोषण सुरू होते. त्या दरम्यान आंदोलन करत असताना अस्वस्थ वाटत असल्याने घरी गेलेल्या राजाराम पाटील यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.

या घटनेनंतर मराठा समज बांधवानी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान राजाराम पाटील यांना आरक्षणाच्या आंदोलनाच्या तणावातून हा त्रास झाल्याचा दावा मराठा समाजाकडून करण्यात आला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या साखळी उपोषणाला राजाराम पाटलांनी सहभागी नोंदवाला होता. त्याठिकाणी घोषणा दिल्या आणि भाषणही केले. मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याची खंत त्यांनी भाषणातून व्यक्त केली होती. 

मात्र त्यांचे हे भाषण अखेरचे ठरले. आंदोलनादरम्यान राजाराम पाटील यांना अस्वस्थ वाटत असल्याने ते घरी गेले होते. मात्र घरी त्यांना उलट्यांचा त्रास झाला. त्यानंतर उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे धुळ्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. सरकार अजून किती मराठा समाज बांधवांचे जीव घेणार असा प्रश्न या निमित्ताने विचारला जातं आहे.

दरम्यान, शनिवारी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे वंशज, जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांनी क्युमाइन क्लबजवळ सुरू असलेल्या मराठा समाजाच्या साखळी उपोषणस्थळी भेट देत आंदोलनास पाठिंबा दिला होता. यावेळी आरक्षणाचे गाजर दाखविणाऱ्या सरकारविरोधात मराठा आंदोलकांनी राज्य सरकारला गाजर दाखवत आंदोलन केले होते.