'जीव गेला तरी माघार नाही', मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार, 'या' तारखेपासून बसणार उपोषणाला

"आता गोळ्या घाला किंवा जेलमध्ये टाका माघार नाही", अशा पद्धतीचा निर्वाणीचा इशाराच मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिला आहे. 

Updated: Jun 7, 2024, 06:52 PM IST
'जीव गेला तरी माघार नाही', मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार, 'या' तारखेपासून बसणार उपोषणाला title=

Manoj Jarange patil Fast Strike : मनोज जरांगे पुन्हा एकदा 8 तारखेपासून उपोषणाला बसणार आहेत. गेल्या आंदोलनात सरकारने सगे सोयरे कायदा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते पूर्ण न झाल्याने पुन्हा एकदा जरांगे आता सरकारविरोधात शड्डू ठोकत आहेत. आता जीव गेला तरी माघार नाही, असा पावित्रा मनोज जरांगे यांनी घेतला आहे. 

जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाची राळ उठणार आहे. मराठा आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा  उपोषणाला बसणार आहेत. आता गोळ्या घाला किंवा जेलमध्ये टाका माघार नाही, अशा पद्धतीचा निर्वाणीचा इशाराच मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिला आहे. सगे सोयरेंबाबत कायदा करा, अन्यथा मराठ्यांचा रोष पत्करा, असे सांगत जरांगे यांनी थेट सरकारविरोधात दंड थोपटले आहेत. मात्र यावेळी जरांगे पाटलांच्या पुढे अडचणींचा डोंगर आहे.  या उपोषणाला आजूबाजूच्या 3 गावांनी विरोध केला आहे. पोलिसांना पत्र लिहून आंदोलनामुळे जातीय सलोखा बिघडतो असा थेट आरोप त्यात करण्यात आला आहे. मात्र हा सरकारचा डाव आहे. आंदोलन करणारच यावर जरांगे ठाम आहे. 

अंतरवली आंदोलनाचा प्रवास

2023 पासून अंतरवलीतील हे आंदोलन पेटलंय. 29 ऑगस्ट 2023 ला आंदोलन सुरु झालं. 1 सप्टेंबरला पोलिसांनी लाठीचार्ज केला, त्यानंतर संपूर्ण राज्यात याचे थेट पडसाद उमटले. 14 सप्टेंबरला मुख्यमंत्री आले आणि उपोषण सोडवलं. त्यावेळी आरक्षणासाठी 45 दिवसाची मुदत सरकारला दिली होती. सरकारने दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी 14 ऑक्टोबरला मोठी सभा घेतली. सरकारने आश्वासन न पूर्ण केल्यानं 25 ऑक्टोबरला अंतरवाली येथे दुसऱ्यांदा उपोषण 8 दिवसांचं करण्यात आले. हे उपोषण 2 नोव्हेंबर रोजी सुटलं. धनंजय मुंडे, संदीपान भुमरे, अतुल सावे, उदय सामंत यांच्या उपस्थितीत हे उपोषण अश्वासनावर  सुटलं. 

20 जानेवारी रोजी मुंबईला आंदोलनासाठी निघाले. मात्र सरकारने पुन्हा आश्वासन दिले. नवी मुंबईत गुलाल उधळत जरांगे माघारी आले. पुन्हा सरकारने फसवल्याचा आरोप करीत 10 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी पर्यत अंतरवाली सराटी येथे तिसऱ्यांदा उपोषण केलं. फडणवीस यांच्यावर राग दाखवत थेट मुंबईकडे निघाले. मात्र पोलिसांनी संचारबंदी लावल्याने जरांगे याना अंतरवाली येथे माघारी फिरावं लागलं. 

मेलो तरी माघार नाही, जरांगेंचा पावित्रा

आता उद्या 8 जूनपासून जरांगे यांनी पुन्हा चौथ्यांदा अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. आता मेलो तरी माघार नाही असा पवित्रा जरांगे यांचा आहे. यावेळी सरकारने मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 288 उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याचा इशारा जरांगे यांनी राज्य सरकारला दिला आहे. खरंतर लोकसभा निवडणुकीतच जरांगे फॅक्टरमुळे राज्य सरकारचं खास करुन भाजपचं मोठं नुकसान झालं आहे. अनेक दिग्गज यामुळे पराभूत झाले आहेत. त्यामुळे जरांगे पाटलांना सहज घेणं सरकारला परवडणारं नाही. याच जरांगे नावाच्या या कोंडीतून सरकार कसा मार्ग काढणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे