गेल्या वर्षभरापासून मराठा समाजाच्या अनेक मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांची आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. सगे सोयरे अंमलबजावणीच्या मागणीवर ठाम राहत जरांगे पाटलांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नाकडे सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याचं म्हणत जरांगे पाटील यांनी निवडणुकीसाठी दंड थोपटलेत.. सरकारला धडा शिकवणारच असा सज्जड दमच जरांगेंनी देत विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. निवडणुकीत कुठल्याही आघाडीमध्ये जाणार नाही, निवडणुकीत लढायचं की पाडायचं, हे लवकरच जाहीर करणार आहेत
मनोज जरांगे पाटलांनी पाडापाडीची भूमिका न घेता निवडून येण्यासाठी प्रयत्न करावेत, असं संभाजीराजे छत्रपतींनी म्हटलं आहे. कोणाला विधानसभेत पाठवायच किंवा कोणाला पाडायच, हे ठरल्याची भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतली आहे.
मनोज जरांगेंनी तिसरी आघाडी नाहीच असा निर्णय घेतला असून, अपक्ष की पाडापाडीचा निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याचं सांगितलं आहे. यावर संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांनी पाडापाडीपेक्षा आपले उमेदवार कसे निवडून आणता येईल हे पहावे असा सल्ला दिला आहे.
"जरांगे यांचा आणि माझा उद्देश एकच आहे. त्यामुळे त्यांनी पाडापाडीपेक्षा आपले उमेदवार कसे निवडून आणता येईल हे पहावे. पाडापाडीची भूमिका घेऊ नका असं मी वडीलधारी व्यक्ती म्हणून मनोज जरांगे यांना सांगितले आहे. जरांगे यांच्यासमोर दोन पर्याय आहेत, एक आमच्या सोबत येणं आणि दुसरे स्वातंत्र लढणे," असं संभाजीराजे म्हणाले आहेत.
दुसरीकडे जरांगेना ज्यांनी रसद पुरवली त्यांना पाडणार असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. "आम्ही काही लोकांची यादी बनवली आहे, त्या मतदारसंघात काम करणार. काही आयटी कंपन्यांसोबत बोललो असून 100 मतदारसंघातील लोकांची मतं जाणून घेतली. आम्ही प्रॅक्टिकल करतो फक्त बोलत नाही. जाती निहाय 100 लोकांची यादी आहे, त्यात सर्वपक्षीय लोक, ज्यांनी जरांगेला रसद पुरविली, पाठिंबा दिला त्यांना पडणार. आम्ही जनतेचा हिस्सा नाही का?," अशी विचारणा त्यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुका लढायच्या की उमेदवार पाडायचे याचा अंतिम निर्णय जरांगे लवकरच घेणार आहेत.. मात्र विधानसभा निवडणुकीच्या धामधूमीत लढण्याऐवजी आता पाडापाडीची भाषा सुरु झालीये.. तेव्हा येणा-या दसरा मेळाव्यात जरांगे पाटील काय भूमिका घेतात आणि ओबीसी नेतेही पाडापाडीवर ठाम राहणार का, हे पाहणं महत्त्वाचं आहे..