Makar Sankranti 2025 : नवीन वर्षाला सुरुवात झाली असून या महिन्यातील पहिला सण असतो तो म्हणजो मकर संक्रांती. धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रानुसार या सणाला विशेष महत्त्व आहे. भारतातील इतर ठिकाणी मकर संक्रांतीला खिचडी, उत्तरायण आणि लोहडी संबोधलं जातं (Uttarayan 2025). वैदिक पंचांगानुसार, ज्या दिवशी सूर्य देव मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवशी मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यात येतो. मकरसंक्रांतीच्या दिवशी खरमास संपतो आणि त्यासोबत शुभ कार्यावरील बंदी दूर होते. हिंदू धर्मानुसार मकर संक्रांती कधी आहे, योग्य तिथी 13, 14 की 15 जानेवारी नेमकं कधी आहे जाणून घ्या. मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दान करण्याच्या शुभ मुहूर्ताही पाहा.
वैदिक पंचांगानुसार मंगळवार, 14 जानेवारी 2025 रोजी सूर्य देव सकाळी 9.03 वाजता मकर राशीत प्रवेश करणार आहे. या कारणास्तव, मकर संक्रांतीचा सण 14 जानेवारी 2025 रोजी साजरा करण्यात येणार आहे. मकर संक्रांतीची पूजा, स्नान, दान इत्यादी शुभ कार्ये शुभ काळात करण्यात येतात. 14 जानेवारी रोजी पुण्यकाल सकाळी 09:03 ते संध्याकाळी 05:46 पर्यंत असणार आहे. तर या दिवशी, महा पुण्यकाळ सकाळी 09:03 ते 10:48 पर्यंत असणार आहे.
धार्मिक मान्यतेनुसार, मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्य उत्तरायणाच्या दिशेने म्हणजेच मकर राशीपासून उत्तर दिशेकडे जातो. म्हणून या सणाला उत्तरायणी असेही म्हणतात. या दिवशी सूर्याची पूजा केली जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवासह अनेक लोक भगवान विष्णूची पूजा करतात. पूजेशिवाय मकर संक्रांतीच्या शुभ दिवशी पवित्र नदीत स्नान करणे आणि गरजू लोकांना दान करणे हे फलदायी मानले जाते.
मकरसंक्रांतीला तीळ दान केल्याने आणि खिचडीचे सेवन केल्याने श्रीहरीची विशेष आशीर्वाद प्राप्त होते, असं मानलं जातं. तसंच कुंडलीत राहू आणि शनीची स्थिती मजबूत होतं.
मकर संक्रांतीला सकाळी लवकर उठून स्नान करा. आंघोळीच्या पाण्यात काळं तीळ आणि गंगाजल टाका. यामुळे सूर्याची कृपा आणि कुंडलीतील ग्रह दोष दूर होतो. खासकरून शनि आणि सूर्याची कृपा मिळते. कारण सूर्यदेव पुत्र शनिदेवांच्या घरी प्रवेश करतात.
मकर संक्रांतीला सूर्यदेवाला अर्घ्य देण्याचं महत्त्व आहे. या दिवशी तांब्यात पाणी घेऊन त्यात काळे तीळ, गुळ, लाल चंदन, लाल फुल, अक्षता टाकून 'ओम सूर्याय नम:' मंत्राचा जप करा आणि अर्घ्य द्या.
मकर संक्रांतीला गरीबांना दान करा. या दिवशी दान दिल्याने पुण्य लाभतं.
मकर संक्रांतीला खिचडी खाण्याची परंपरा आहे. म्हणून या दिवसाला खिचडी पर्व संबोधलं जातं.
मकर संक्रांतीला तीळगूळ खा आणि वाटा
मकर संक्रांतीला वसंत ऋतु सुरू होतो आणि या दिवसापासून रात्र छोटी आणि दिवस मोठा होतो.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)