कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे : भारत आणि इस्त्रायल यांच्यात मैत्रीचे संबंध दृढ होत आहे. मात्र हे संबंध दृढ होण्याआधीपासून गेली कित्येक वर्षे भारतीय समाजाचा भाग बनून ज्यू धर्मीय राहिले आहेत. ठाणे आणि ज्यू यांचं नातं तर खुपच जुनं... या नात्याला नवी झळाळी लाभलीय ती इस्त्रायलच्या तांत्रिक टीमने तयार केलेल्या 'डीजी ठाणे' या अॅप्लीकेशनमुळे... भारत आणि इस्त्रायलला एकमेकांच्या मैत्रीत जखडून ठेवणारा हा हळूवार बंध सांगणारा हा विशेष रिपोर्ट...
ठाणे महापालिका, ठाणेकर नागरिक आणि ठाण्यातले उद्योजक यांना एकत्रित आणणारं अनोखं 'डीजीठाणे' अॅप नुकतंच सुरू करण्यात आलं. इस्त्रायलच्या टीमने स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत हे अॅप तयार करून दिलं. त्याचं उद्घाटन तेलअवीवच्या महापौरांच्या हस्ते २३ जानेवारीला झालं.
भारत आणि इस्त्रायल यांच्यातल्या मैत्रीचा हा अनोखा बंध आहे... मात्र भारत आणि इस्त्रायल यांच्यातल्या मैत्रीचे अध्याय लिहीण्याआधीपासूनच राज्यात ज्यू समाजाचे आणि भारताचे २००० वर्षांचे बंध आहेत.
२००० वर्षांपूर्वी अन्याय झाल्यामुळे भारताच्या दिशेने निघालेल्या ज्यू समाजाची एक बोट केरळात कोचीनच्या दिशेने तर दुसरी कोकणात नवगावच्या दिशेने आली. त्यातली नवगावच्या किनाऱ्याला आलेली बोट फुटली. मात्र, त्यातल्या सात कुटुंबांना कोकणातल्या स्थानिकांनी आसरा दिला...
सात परिवारांची दोन हजार वर्षांत ७० हजारांची संख्या झाली... या कालावधीत ही मंडळी पूर्णपणे भारतीय झाली. मराठी भाषा, मराठी आचारविचार रूळले. कोचीन भागात गेलेले 'कोचीन ज्यू' म्हणून ओळखले जाऊ लागले तर कोकणात राहिलेल्यांना 'बेने इस्त्रायली' ही ओळख मिळाली.
ज्यू धर्माच्या 'लॉ ऑफ रिटर्न' कायद्यानुसार आज ७० हजारांपैकी किमान ६५ हजार नागरिक इस्त्रायला गेले आहेत. पण, बाकीचे उरलेले आजही महाराष्ट्रात विशेषतः ठाणे कोकण पट्ट्यात आहेत. ठाण्यात त्यांचं 'सिनेगॉग' हे प्रार्थना स्थळही आहे. धर्म ज्यू असला तरी संपूर्णपणे महाराष्ट्रीय पद्धती ते अवलंबतात. लग्नाआधी हळद, हातावर मेंदी काढतात. भारताला आपली मातृभूमी समजतात तर इस्त्रायलला पितृभूमी किंवा धर्मभूमी समजतात.
मात्र, इस्त्रायलला गेल्यावरही भारतीय ज्यू आपली मराठी संस्कृती विसरले नाहीत. आमची मुंबई आम्हाला सोडवत नाही, असं ते म्हणतात. इस्त्रायला गेल्यावरही मराठी भाषा तिथल्या मुलांना शिकता यावी यासाठी तिथल्या विद्यापीठात मराठी भाषा विभाग सुरू करण्यात आला. आपल्या मायभूमीने म्हणजेच भारताने दिलेले संस्कार आपल्या पुढच्या पिढ्यांनाही मिळावे, यासाठी मायबोली नावाचं नियतकालीकही इस्त्रायलमध्ये चालवलं जातं.
मराठी बोलणाऱ्या मराठी पद्धतीने राहणाऱ्या या बेने इस्त्रायलींच्या नावाची एक मौज आढळते. नाव, वडिलांचं नाव यहुदी पद्धतीने तर अडनाव मात्र मराठी पद्धतीने आढळतं. जिथे जिथे ज्यू स्थायिक झाले त्या गावानुसार त्यांचं आडनाव रूढ झालं. त्यामुळे आक्लीकर, पेणकर, श्रीवर्धनकर, बामणोलीकर रोहेकर आडनावाचे ज्यू दिसतात.
इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू नुकतेच भारत दौऱ्यावर आले होते. भारत आणि इस्त्रायल हे नैसर्गिक मित्र असल्याचं दोन्ही देशांच्या नेत्यांनी म्हटलंय. पण ही मैत्री केवळ करार मदारावर आधारीत नाही.... भारतातल्या विशेषतः कोकणातल्या ज्यू मंडळींमुळे या मैत्रीला कौटुंबिक स्वरूप आहे...