पैसाच पैसा, नोटांची बंडलं, सोनं, चांदी.. वाचा मनी हाईस्टचा 'धुळे पॅटर्न!'

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारा 'सावकारी कांड' दररोज नवं नवे अवैध संपत्तीचे विक्रम गाठत आहे

Updated: Jun 3, 2022, 10:16 PM IST
पैसाच पैसा, नोटांची बंडलं, सोनं, चांदी.. वाचा मनी हाईस्टचा 'धुळे पॅटर्न!' title=

प्रशांत परदेशी, झी २४ तास, धुळे : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारा 'सावकारी कांड' दररोज नवं नवे अवैध संपत्तीचे विक्रम गाठत आहे. शहरातील सावकार विमा एजंट राजेंद्र बंब याच्या विरोधात धुळे शहरातील आझादनगर पोलीस ठाण्यात अवैध सावकारीचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता बंबच्या घराची आणि बँक लॉकरची चौकशी सुरु केली. चौकशी गेल्या चार दिवसापासून सुरु आहे. मात्र अद्यापही बंबच्या संपत्तीची मोजदाद पोलिसांना करता आलेली नाही. 

सावकारीतून मिळवलेल्या बेकायदेशीर संपत्तीची मोजदाद दरोरोज नवं नवे उच्चांक गाठतायत. जिल्ह्याच्या चौक चौकात सध्या बंबचे कारनामे आणि त्याच्या सापडलेल्या आणि न सापडलेल्या संपत्तीचीच चर्चा आहे.

सावकार राजेंद्र बंब याच्याकडे तिसऱ्या दिवशीही मोठं घबाड सापडलं कोट्यवधींची रोकड, अनेक किलो सोने, चांदी, संपत्ती कागदपत्र  सापडली. यासोबत विदेशी चलनही सापडले. तपास यंत्रणांनी आज (शुक्रवारी) एका बॅकेत सहापैकी पाच लॉकर तपासले. त्यात नोटा कोंबलेल्या सापडल्या. 

तिसऱ्या दिवसाच्या चौकशीत 5 कोटी 13 लाख 44 हजार 530  रोकड सापडली. सोबतच 10 किलो 563 ग्राम असे 5 कोटी 54 लाख किमतीचं सोनं जप्त करण्यात आलं आहे. यासोबत 7 किलो 621 ग्राम चांदी देखील जप्त करण्यात आली आहे. सापडलेल्या घबाडात सोन्याची 67 बिस्किटं आहेत. 

बंबच्या राष्ट्रीयकृत बँकांच्या खात्याची चौकशी देखील केली जाणार आहे. याबाबतही पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी माहिती दिली. 4 दिवसांपासून तपास यंत्रणा बंबच्या संपत्ती मोजत आहेत. 

गेल्या तिन दिवसात 9 कोटी 10 लाखाची रोकड सापडली असुन, सहा कोटी 25 लाखांचे दागिने सापडले आहेत. मालमत्तेची कागदपत्र ही मोठ्याप्रमाणात सापडली आहेत. बंबच्या संपत्तीचे आकडे पाहून संपूर्ण खान्देशात खळबळ उडाली आहे. प्रत्येक चौकात याच संपत्तीचे किस्से ऐकायला मिळत आहेत. एवढा मोठा मासा आयकर विभागाच्या रडारवर कसा आला नाही? याचेही आश्चर्य  व्यक्त केले जात आहे. 

marathi news dhule savkari kand and police busted huge cash and gold