विशाल करोळे/ औरंगाबाद : आता बातमी एका आगळ्या वेगळ्या लग्नाची. हे लग्न पार पडलं पोलीस स्टेशनमध्ये, जिथं वऱ्हाडी होते पोलीस. (Marriage in police station at Aurangabad ) थेट पोलीस स्टेशनलाच लग्न करण्याची वेळ या जोडप्यावर का आली?
औरंगाबादचं (Aurangabad ) हे पुंडलीकनगर पोलीस स्टेशन. (police station) या पोलीस ठाण्यात चक्क लग्नाची लगबग पाहायला मिळाली. एरव्ही गुन्हेगारांची हजेरी घेणारे पोलीस लग्नाच्या तयारीत गुंग झाले होते. लग्न होतं रुपाली आणि विवेकचे. दोघंही उच्चशिक्षित. सात वर्षांपासून दोघांचे प्रेमसंबंध होते. पण रुपालीच्या घरच्यांचा लग्नाला विरोध होता. या विरोधातून रुपालीला घरातच कैद करण्यात आले होते. तिनं नैराश्यातून एकदा आत्महत्येचा प्रयत्नही केला. शेवटी विवेकनं पोलिसांची मदत मागितली, अशी माहिती पोलीस निरीक्षक घनस्याम सोनवणे यांनी दिली.
लग्नात पोलीसच वऱ्हाडी होते. वधूवरांच्या पित्याची भूमिकाही पोलिसांनीच निभावली. निवडक लोकांच्या उपस्थितीत हे लग्न पार पडलं. पालकांनी मुलांना समजावून घ्यावं अशी साद नवदाम्पत्यानं घातली. अगदी साधेपणानं हे जगावेगळं लग्न पार पडलं. झालं गेलं गंगेला मिळालं हे समजून पालकांनीही या नवदाम्पत्याला शुभाशिर्वाद द्यावेत हीच अपेक्षा.