प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : आधी संचयनी त्यानंतर कल्पवृक्ष आणि सॅफरॉन आणि आता मातृभूमी. चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून मातृभूमी ग्रृप ऑफ कंपनीने रत्नागिरीत करोडो रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 1 हजार 404 गुंतवणूकदारांना तब्बल 2 कोटी 34 लाखांचा या कंपनीने चुना लावला आहे. चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून मातृभूमी ग्रृप ऑफ कंपनीने राज्यभरात करोडो रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात कंपनीच्या चौघा संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील दोघांना गुजरात पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
फसवणूक करणाऱ्या मातृभूमी ग्रृप ऑफ कंपनीचे मुख्य कार्यालय घोडबंदर ठाणे येथे असून कंपनीने चिपळूण येथील इब्राहिम कॉम्प्लेक्समध्ये 2009 मध्ये कार्यालय सुरू केले होत़े. जिह्यामध्ये विविध ठिकाणी एजंटची नेमणूक करून गुंतवणूकीवर 18 टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून ठेवी गोळा करण्यात आल्या. एजंटला गुंतवणुकीवर 5 टक्के व्याज, मेडीक्लेम पॉलिसीच्या 100 रूपयांच्या गुंतवणुकीवर अपघात झाल्यास 20 हजार आणि मृत्यू झाल्यास 80 हजार रूपये देण्याचे आमिष कंपनीकडून दाखविण्यात आले.
या प्रकरणी प्रदीप गर्ग, संजय हेमंत बिश्वास, मिलिंद अनंत जाधव आणि विनोदभाई पटेल अशी गुन्हा दाखल झालेल्या मातृभूमीच्या संचालकांची नावे आहेत़. याच कंपनीत एजंटचे काम करणारे अरविंद सदानंद मोरे यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली. यातील विनोद पटेल आणि संजय बिश्वास यांना फसवणुकीच्या गुह्याखाली गुजरात पोलिसांकडून अटक करण्यात आली असून त्यांचा ताबा घेण्याचे काम रत्नागिरी पोलिसांकडून सुरू आहे.
मातृभूमी या कंपनीची राज्यभरात 15 ठिकाणी कार्यालयं होती. यातील बहुतांश कार्यालये आता बंद पडली आहेत. यामध्ये भोईसर, बोरीवली, डहाणू, हिंगोली, कोल्हापूर, कुडाळ, लातूर, मंडणगड, नाशिक, उस्मानाबाद, पंढरपूर, पेण, सांगली, पुणे झोन, मुळशी इथल्या कार्यालयांचा समावेश आहे.
सुरुवातीला गुंतवणुकदारांना जाळ्यात अडकविण्यासाठी वेळेवर परतावा देण्यात आल़ा मात्र त्यानंतर परतावा न देता संचालक मंडळाने जिह्यातून पोबारा केल़ा. या अगोदर रत्नागिरीमध्ये अनेक कंपन्यानी फसवणूक केल्याचं उघडकीस आलंय त्यामध्ये पॅनकार्ड, सॅफरॉन, संचयनि, ट्विंकल आणि आता यामध्ये भर पडली आहे ती मातृभूमी कंपनीची. त्यामुळे रत्नागिरीकरांनो आता तरी सावध व्हा.
"मातृभूमी या कंपनीच्या माध्यमातून ज्या गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. त्यांनी कागदपत्रांसह चिपळूण पोलीस ठाणे अथवा अधीक्षक कार्यालय येथे संपर्क साधावा" असे आवाहन रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी केले आहे.
मातृभूमी ग्रृप ऑफ कंपनीच्या अंतर्गत 10 हून अधिक कंपन्या स्थापन करण्यात आल्या. यामध्ये मातृभूमी ईन ल़ि, मातृभूमी रियलटेक डेव्हलपमेंट ल़ि, मातृभूमी एक्झॉटिक हॉस्पिटीलीटी, मातृभूमी डेअरी प्रा ल़ि, मातृभूमी फार्म ऍण्ड रिसोर्टस प्रा लि, मातृभूमी टूर्स ऍण्ड हॉलिडेज, मातृभूमी इन्शुरन्स सर्व्हिसेस प्रा ल़ि, मातृभूमी पब्लिकेशन्स, मातृभूमी फाऊंडेशन, मातृभूमी पॅब्रिकेशन्स आदींचा समावेश आहे.