मुंबई : आदिवासी भागात आढळणाऱ्या रानभाज्यांचे मार्केटिंग करण्याचा निर्णय राज्याच्या कृषी विभागाने घेतला आहे. यासाठी ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात रानभाज्या महोत्सव भरवला जाणार आहे. मंत्रालयात या महोत्सवाचे उद्घाटन झालं. राज्याच गडचिरोली, नंदूरबारपासून ते पालघर, रायगडपर्यंत ६० ते ७० रानभाज्या आढळतात. आरोग्यासाठीही या रानभाज्या महत्त्वाच्या आहेत. यातून आदिवासींना उत्पन्न मिळावं म्हणून या रानभाज्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न आहे.
रानभाज्या महोत्सव प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाला निर्देश देण्यात आल्याचे भुसे यांनी सांगितले. या रानभाज्या नागरिकांना कायमस्वरूपी कशा उपलब्ध होतील यांचेही नियोजन करण्यात येणार आहे.
शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून हा रानभाज्यांचा औषधी ठेवा शहरातील नागरिकांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे कृषीमंत्री म्हणाले.
यावेळी शहापूर आणि वाडा येथून आलेल्या महिलांनी रानभाज्यांची ओळख सांगितली. त्याचबरोबर त्यांचे औषधी गुणधर्मही त्यांनी सांगितले.
जंगलात आढळणाऱ्या या रानभाज्या, फळं विविध आजारांवर गुणकारी असून त्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होण्यासाठी या रानभाज्या उपयुक्त ठरू शकतात.
मात्र शहरी भागातील नागरिकांपर्यंत त्या पोहोचण्यासाठी त्या केवळ प्रदर्शनात न राहता त्यांची विक्री व्यवस्था अधिक बळकट करण्याची गरज आहे.
त्यासाठी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत राज्यभर रानभाज्या महोत्सवाची संकल्पना सुचली आणि कृषी विभागाच्या माध्यमातून ही संकल्पना प्रत्यक्षात आणली जात असल्याचे त्यांनी सांगितले. आदिवासी भागातील बाधवांना त्यामुळे रोजगार निर्माण होऊ शकणार आहे.