रायगडात संततधार : पुरामुळे १०० हून अधिक नागरिकांचे स्‍थलांतर तर मुंबई - गोवा महामार्ग ठप्प

रायगड जिल्‍हयात पावसाची संततधार सुरुच आहे. पुरामुळे १०० नागरिकांचे  स्‍थलांतर करण्यात आले आहे. तर रायगड येथे मुंबई - गोवा महामार्ग ठप्प झाला आहे.  

Updated: Aug 5, 2020, 02:03 PM IST
रायगडात संततधार : पुरामुळे १०० हून अधिक नागरिकांचे  स्‍थलांतर तर मुंबई - गोवा महामार्ग ठप्प  title=

प्रफुल्ल पवार / अलिबाग : रायगड जिल्‍हयात पावसाची संततधार सुरुच आहे. जिल्‍हयाच्‍या सर्वच भागात अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत.  महाडसह पोलादपूर , माणगाव , म्हसळा , अलिबाग , रोहा , पाली तळा या तालुक्यात पावसाचा जोर अधिक आहे.  सावित्री नदीने धोक्‍याची पातळी ओलांडली आहे.  तर कुंडलिका व अंबा नदीचे पाणी इशारा पातळीपर्यंत पोहोचले आहे. महाड बाजारपेठेत कालपासून आलेले पुराचे पाणी कमी व्‍हायचं नाव घेत नाही. शहरातील काही भागात तीन फुटांपर्यंत पाणी असून ते वाढत चालले आहे. पुरामुळे १०० नागरिकांचे  स्‍थलांतर करण्यात आले आहे. तर रायगड येथे मुंबई - गोवा महामार्ग ठप्प झाला आहे. माणगाव जवळ घोडनदीला पूर आल्याने वाहतूक भिरा निजामपूर मार्गे वळवली आहे.

पूरस्थिती कायम, आपत्कालीन यंत्रणा सज्ज

महाडमधील पुराचा धोका लक्षात घेवून आपत्‍कालीन यंत्रणा सज्‍ज ठेवण्‍यात आली आहे. १०० हून अधिक नागरीकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्‍यात आले आहे. नगरपालिकेच्‍या दोन आणि खासगी चार बोटी मनुष्‍यबळासह आपत्‍कालीन परीस्थितीत वापरण्‍यासाठी सज्‍ज आहेत. नगरपालिकेने सायरन वाजवून सतर्कतेचा इशारा दिला असल्‍याचे महाड नगरपालिकेचे मुख्‍याधिकारी जीवन पाटील यांनी सांगितले. 

महाड येथील पूरस्थिती गंभीर होण्याची भीती असल्याने जिल्ह्याची आपत्कालीन यंत्रणा कामाला लागली आहे. तटरक्षक दलाचे पथक महाडकडे रवाना झाले आहे. दोन अधिकारी , १०जवान , ट्रक , बोट , लाईफ जॅकेट्स व्हिएच एफ सेट , लाईफ बोया सह पथक रवाना झाले आहे. माणगाव तालुक्यातील रीळेपाचोळे , निळगुण या गावांचा संपर्क तुटला आहे. तर रोहा , माणगाव येथे वाइल्डर वेस्ट अॅडव्हेंचरचे पथक तैनात करण्यात आले आहे.

माणगाव - श्रीवर्धन मार्गावर दरड 

माणगाव - श्रीवर्धन मार्गावर घोणसे घाटात दरड कोसळली असून ती बाजूला करण्‍याचे काम सुरु आहे . तर याच मार्गावर मोर्बा इथं साचलेल्‍या पाण्‍यात टँकर अडकून पडला आहे त्‍यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्‍यात आली आहे. अंबा नदीवरील पाली येथील पूल वाहतुकीसाठी खुला झाला असला तरी पावसाचा जोर असाच कायम राहिला पुन्‍हा पुलावर पाणी येण्‍याची शक्‍यता आहे.  आज सकाळपर्यंतच्‍या २४  तासात जिल्‍हयात १४४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. माणगाव तालुक्‍यात सर्वाधिक ३२६ मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे.  तर श्रीवर्धन येथे १५८ , म्‍हसळा १७६ , महाड १४७ , माथेरान येथे १४० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.