भाजपचे नरेंद्र पाटील - राष्ट्रवादीचे शिवेंद्रसिंहराजे यांची भेट, राजकीय चर्चांना उधाण

भाजपचे नरेंद्र पाटील यांनी साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या गाठी‌ भेटी घेण्यास सुरुवात केली आहे.  

Updated: Feb 23, 2019, 07:03 PM IST
भाजपचे नरेंद्र पाटील - राष्ट्रवादीचे शिवेंद्रसिंहराजे यांची भेट, राजकीय चर्चांना उधाण  title=

सातारा : लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून माथाडी कामगारांचे युवा नेते आणि माजी आमदार नरेंद्र पाटील यांचे नाव पुढे येत असतानाच आज त्यांनी चक्क राष्ट्रवादीत साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या बरोबर मिसळ खाल्ल्याने या राजकीय मिसळ मुळे चर्चेला साताऱ्यात चांगलेच उधाण आले आहे. भाजपचे नरेंद्र पाटील यांनी साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या गाठी‌ भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. भाजपकडून लोकसभेचे इच्छुक नरेंद्र पाटील आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट झाली. साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये या दोन्ही नेत्यांनी 'मिसळी'चा आनंद घेतला. सध्या साताऱ्याचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्यात वाद सुरु आहे. या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमधील चर्चेमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

आज आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतल्यानंतर या दोघांनी साताऱ्यातील प्रसिद्ध हॉटेल चंद्रविलास या वर्दळीच्या ठिकाणी जाऊन एकत्र मिसळ खाल्ली. जुनी मैत्री असल्याने एकत्र येऊन 'मिसळी'चा आस्वाद घेतल्याचे हे दोघेही सांगत असले तरी सध्या खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंह राजे यांच्यात तणाव आहे त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत फायदा मिळावा, अशी अपेक्षा नरेंद्र पाटील यांना आहे. याबाबत त्यांना विचारले असता परिवर्तनाची ही 'मिसळ' असल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे
 
साताऱ्यातील प्रसिद्ध मिसळ खाण्याचे निमंत्रण मी नरेंद्र पाटील यांना दिले होते त्यामुळे या भेटीचा आता तरी वेगळा अर्थ काढू नका, असे आमदार शिवेंद्रराजे म्हणाले असले तरी वेट अँड वाच हे ही सांगायला ते विसरले नाहीत. शिवेंद्रराजे भोसले हे राजकारणात सक्रिय आहेत पण ते सध्या वेगवेगळी पावले उचलताना दिसत आहेत त्यामुळे पडद्याच्या पाठीमागे काहीतरी घडते आहे असे साताऱ्यातील जेष्ठ पत्रकारांना वाटत आहे. जुनी मैत्री असल्याचे कारण दोघे सांगत असले तरी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी साताऱ्यातून नेमकी राष्ट्रवादीच्या नेत्यांमधुन काय रणणिती असणार याकडे सर्वाच लक्ष लागुन राहिले आहे. या भेटीमुळे उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांचे संबंध अजून ताणले जाणार का? की या  भेटीचा  दोघांच्या भविष्यातील मनोमिलनावर काही फरक पडणार. हे पाहणे महत्वाचे ठरेल.