महाराष्ट्रात प्रोजेक्ट मिळण्याधी 'या' कंपनीने विकत घेतले 140 कोटींचे इलेक्टोरल बॉन्ड,

Megha Engineering: मेघा इंजिनीअरिंग या बड्या कंपनीला 14 हजार 400 कोटी रुपयांचा ठाणे-बोरिवली ट्विन टनल प्रोजेक्टसाठी टेंडर मिळाले.

Updated: Mar 22, 2024, 03:43 PM IST
महाराष्ट्रात प्रोजेक्ट मिळण्याधी 'या' कंपनीने विकत घेतले 140 कोटींचे इलेक्टोरल बॉन्ड,  title=
Megha Engineering Electoral bonds

Megha Engineering: मेघा ग्रुप हा सर्वाधिक इलेक्ट्रोल बॉण्ड खरेदी करणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. इन्फ्रास्ट्रक्चक कंपनी मेघा इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (MEIL) ही मूळची हैदराबादची कंपनी आहे. महाराष्ट्रात प्रोजेक्ट मिळण्याआधी या कंपनीने कोट्यावधी रुपयांचे इलेक्टोरल बॉन्ड खरेदी केले होते. इंडियन एक्सप्रेसने यासंदर्भात वृत्त दिले आहे. समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार, मेघा इंजिनीअरिंग या बड्या कंपनीला 14 हजार 400 कोटी रुपयांचा ठाणे-बोरिवली ट्विन टनल प्रोजेक्टसाठी टेंडर मिळाले. 11 एप्रिल 2023 रोजी कंपनीने 140 कोटी रुपयांचे इलेक्टोरल बॉन्ड खरेदी केले होते. 

प्रोजेक्ट मिळण्याआधीच कोट्यवधींची खरेदी 

मेघा इंजिनीअरिंगची स्थापना 1989 मध्ये झाली होती. या कंपनीने साधारण 821 कोटींचे इलेक्टोरल बॉन्ड खरेदी केले होते. 

मेघा ग्रुपलाच मिळाला होता प्रोजेक्ट 

महाराष्ट्र सरकारच्या मुंबई महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरण (MMRDA) ने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या आतून 2 रस्त्यांच्या योजनेसाठी निविदा जाहीर केली होती. यासाठी मेघा ग्रुपने बोली लावली होती आणि या कंपनीलाच प्रोजेक्ट मिळाला. 

'एल अ‍ॅण्ड टी'ला नाही मिळाला प्रोजेक्ट 

'एल अ‍ॅण्ड टी' कंपनीने यासाठी बोली लावली होती. पण त्यांची बोली फेटाळण्यात आली. आपल्या फेटाळण्यात आलेल्या बोलीबद्दल एल अॅण्ड टी कंपनीने 2 याचिका दाखल केल्या होत्या. बोली लावण्यात आल्यानंतर त्रुटीमध्ये सुधार करण्याला परवानगी दिली जाणार नाही, असे एमएमआरडीएने कोर्टात सांगितले.

काय आहे ट्विन टनल प्रोजेक्ट?

एमएमआरडीएच्या ट्वीन टनल अंतर्गत मुंबई महानगर प्रदेशातील दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांना जोडले जाणार आहे. यामुळे वाहतूक कोंडी कमी होणार आहे.  संजय गांधी राष्ट्रीय उद्यान भूमिगत भुयारी मार्गाच्या सहाय्याने ठाणे आणि बोरिवली दरम्यानचे अंतर कमी होणार आहे. ज्यामुळे या भागातील प्रवासाच्या वेळेत सुमारे 1 तासांची बचत होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मुंबई जिल्ह्याच्या पश्चिम उपनगरातील बोरीवली आणि ठाणे जिल्ह्याला भूमिगत मार्गाने जोडले जाणार आहे. या प्रकल्पाच्या व्याप्तीमध्ये 10.25 किमीचा बोगदा आणि 1.55 किमीचा पोहचमार्ग असा 13.5 मीटर अंतर्गत व्यासासह सुमारे 12 किमी लांबीचा दुहेरी भूमिगत बोगदा असेल.