लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज्यातील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. शासकीय आश्रमशाळांमध्ये वाटप करण्यात येणाऱ्या दूध खरेदीमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे. पत्रकार परिषदेमध्ये थेट शासकीय कागदपत्रांच्या आधारे रोहित पवार यांनी राज्य सरकारवर 80 कोटींचा दूध खरेदी घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे एका अज्ञात व्यक्तीने आपल्याला या सर्व खरेदीसंदर्भातील फाईल्स पाठवल्याचा दावाही रोहित पवारांनी केला आहे.
पत्रकार परिषदेमध्ये सरकारी कागदपत्रं दाखवत रोहित पवारांनी, एका अज्ञात व्यक्तीने आपल्याला 11 फाइल्स पाठवल्याचं सांगितलं. ही व्यक्ती राज्य सरकारमधील असेल अशी शंकाही रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. आपण आज उघड करत असलेला घोटाळा या 11 फाईल्सपैकी केवळ 2 फाइल्समधील तपशीलाच्या आधारे समोर आल्याचं रोहित पवार म्हणाले. या फाईल्समधील तपशील पडताळून पाहिल्यानंतरच घोटाळ्यासंदर्भातील दावे आपण करत असल्याचं त्यांनी नमूद केलं. या फाईल्समध्ये राज्यातील 552 शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना वाटप केल्या जाणाऱ्या दुधाच्या खरेदीमध्ये सरकारने घोटाळा केल्याचं रोहित पवार म्हणाले. या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना प्रत्येकी 200 मिली लिटर दूध दिलं जावं अशी अधिसूचना राज्य सरकारने जारी केलेली. सदर शाळांमध्ये राज्यात तब्बल 1.87 लाख विद्यार्थी शिकतात. या दूध वाटपासाठी सरकारने दूध विक्रेत्या कंपन्यांबरोबर करार करण्यात आले. यासंदर्भातील कंत्राटंही जारी केली. यापैकी पहिला करार 2018-19 झाला. नंतर थेट 2023-24 रोजी दुसरा करार झाला. त्याअंतर्गत अमूल, महानंदा, आरे आणि चितळेबरोबर करार झाल्याचं या कागदपत्रांमध्ये असल्याचा दावा रोहित यांनी केला.
दूध खरेदीच्या दरामध्ये फेरफार करुन घोटाळा करण्यात आल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. "2018-19 च्या करारामधील आकडेवारी विद्यार्थ्यांना देण्यात आलेलं दूध 46.49 रुपये प्रति लिटर दराने खरेदी करण्यात आलं होतं. तर नव्या म्हणजेच 2023-24 च्या करारामध्ये अमूल कंपनीकडून सरकारने 50.75 रुपये प्रति लिटर दराने दूध खरेदी करण्याचं निश्चित केलं. याच दूध खरेदीसाठी 2023-24 मध्ये राज्य सरकारने 164 कोटींची नवी निविदा जारी केली. यानुसार 200 मिली लीटरचे दुधाचे तब्बल 5 कोटी 71 लाख टेट्रा पॅक खरेदी करुन वाटप करण्याचं निश्चित केलं गेलं. म्हणजेच एकीकडे दूध कंपन्या तसेच दूध उत्पादक संघ शेतकऱ्यांकडून दूध विकत घेताना प्रति लिटर केवळ 24 रुपये ते 31 रुपयांचा दर देतात. मात्र राज्य सरकारने आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांना वाटप करण्यासाठी 2023-24 मध्ये तब्बल 146 रुपये प्रति लिटर दराने दूध खरेदी केली. आधी हा दर केवळ 50 रुपयांच्या आसपास होता," असं रोहित पवार फाईलमधील तपशीलाचा हवाला देत म्हणाले.
नक्की वाचा >> 'भाजपा घाबरलीये! चुकून 2024 ला सत्तेत आल्यास..'; पवार आत्या-भाच्याचा मोदी सरकारला टोला
पुढे बोलताना रोहित पवार यांनी, "आपल्या देशातील सर्वात श्रीमंत लोक म्हणजेच अंबानी-अदाणींसारखे लोकही एवढं महागडं दूध खरेदी करत नसतील," असा खोचक टोलाही लगावला. राज्य सरकारने हा घोटाळा पुण्यातील आंबेगावमधील एका कंपनीच्या माध्यमातून केला. तसेच यासाठी कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यामधील सत्ताधारी प७ाच्या नेत्याच्या कंपनीशी करार केला गेला, असा आरोपही रोहित यांनी केला.
घाऊक बाजारामध्ये एक लिटर दुधाचा टेट्रापॅक 55 रुपयांना मिळतो. 200 मिली लिटरचा टेट्रापॅक 14 रुपयांना मिळते. त्यामुळे हा सारा खर्च पाहिल्यास 85 कोटींपेक्षाही कमी आहे. मात्र त्यासाठी सरकारने 165 कोटी खर्च केलं. म्हणजेच सरकारने 80 कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे, असा दावा रोहित पवारांनी केला.