केमिकलयुक्त ताडीची विक्री, आंतराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश

केमिकलयुक्त ताडी बनवून हजारो लोकांचं आरोग्य धोक्यात घालणा-या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश झालाय. उत्पादन शुल्क विभागानं फिल्मी स्टाइलनं धाड टाकून ही कारवाई केलीय.

Updated: Nov 30, 2017, 09:36 PM IST
केमिकलयुक्त ताडीची विक्री, आंतराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश title=

सातारा : केमिकलयुक्त ताडी बनवून हजारो लोकांचं आरोग्य धोक्यात घालणा-या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश झालाय. उत्पादन शुल्क विभागानं फिल्मी स्टाइलनं धाड टाकून ही कारवाई केलीय.

 लोकांच्या जीवाशी खेळ

साताऱ्यातील अतीत पाली रोड येथील ही मेसर्स अस्मिता केमिकल कंपनी. या कंपनीचा मालक आहे मिलिंद घाडगे. हा घाडगे उच्च शिक्षित आहे. बीई केमिकलचं शिक्षण त्यानं घेतलंय. पण आपल्या शिक्षणाचा वापर त्यानं लोकांच्या जीवाशी खेळण्याकरिता केला.

क्लोरल हायड्रेटचा वापर 

हा घाडगे त्याच्या केमिकल कंपनीत क्लोरल हायड्रेट नावाची विषारी पावडर बनवायचा आणि ती राज्याच्या कानाकोप-यात पाठवायचा... या क्लोरल हायड्रेटचा वापर ताडी या मद्यात भेसळ करण्याकरता केला जात असे. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिका-यांना ही माहिती समजताच त्यांनी कंपनीवर आठ दिवस पाळत ठेवून धाड टाकली... ५ हजार किलो क्लोरल हायड्रेट विषारी पावडर आणि इतर घातक रसायनांचा साठा यावेळी जप्त करण्यात आला. या साठ्याची किंमत सुमारे ४० लाख रुपये इतकी आहे. 

 एक डोंबिवलीतून फरार 

मिलिंद घाडगेसोबत दिनकर नलावडे आणि प्रकाश जेठाभाई गोपवाणी या दोघांनाही अटक करण्यात आलीय. गोपवाणी क्लोरल हायड्रेट तयार करण्यासाठी लागणारी कच्ची रसायनं पुरवत होता. या टोळीचा आणखी एक म्होरक्या श्रीनिवासन उर्फ नरेंद्र व्यंकट नरसय्या भीमानाथानी हा त्याच्या डोंबिवली येथील घरातून फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेतायेत.

 जीवाला मोठा धोका 

लोकांना कमीत कमी ताडीत जास्त नशा व्हावा यासाठी क्लोरल हायड्रेट पावडरची भेसळ केली जायची.. पण त्यामुळं ताडी पिणाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होत होता. या टोळीनं या विषारी पावडरची तस्करी इतर राज्यात केल्याचा संशय राज्य उत्पादन शुल्क विभागाला आहे. त्यादृष्टीनं पुढील तपास केला जातोय.