अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती: सर्वसामान्य पालकांच्या मुलांनी भरलेल्या शैक्षणिक फीवर गडगंज झालेल्या शैक्षणिक संस्था कोरोना काळातही शेतकऱ्याच्या मुलांवर पैशांसाठी जबरदस्ती करत असल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार अमरावती जिल्ह्यात समोर आला आहे. इयत्ता १२ वी वर्गाची शिल्लक असलेली शैक्षणिक फी भरली नाही म्हणून त्या विद्यार्थ्यांची टीसी मार्कशीट अडवून ठेवल्याचा प्रताप वर्धा जिल्ह्यातील पुलगावमधील सैनिकी शाळेने केला आहे. या प्रकरणी आता शेतकरी पित्याने सरकार कडेच मदतीची याचना केली आहे.
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील घुसळी-कामनापूर येथील यश जगदीश काटगळे या शेतकऱ्याच्या मुलाला सैन्यात जाऊन देशसेवा करायची आहे. त्यासाठी त्याने वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील सैनिकी शाळेत इयत्ता पाचवी ते बारावी पर्यतचे शिक्षण घेतले. आता त्याला पुढील शिक्षणासाठी त्याला अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शहरातील आदर्श महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे. परंतु या शेतकऱ्याच्या मुलाकडे वर्ग बारावीची सैनिकी शाळेची २२ हजारांची फी शिल्लक आहे. बोगस बियाणे व पावसाने सुरवातीला दडी दिल्याने या विद्यार्थ्यांच्या वडिलांना तिबार पेरणी करावी लागली. घरात होता नव्हता पैसा शेतीला लागून गेल्याने आता आता मुलाची २२ हजार शिल्लक फी भरण्याचीही परिस्थिती नसल्याने आता सैनिकी शाळेने त्याला टीसी आणि गुणपत्रिका देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आपल्या मुलाला पुढील शिक्षण कसे द्यावे असा प्रश्न या शेतकरी बापाला पडला आहे.
जगदीश काटगळे यांच्याकडे चार एकर शेती आहे. गेल्यावर्षी पिकाने फटका दिला. यामधून सावरत यंदा उसनवारीवर त्यांनी शेतात सोयाबीन पेरले. मात्र, बोगस बियाणे आणि पावसाची दडी मारल्याने तिबार पेरणीचे संकट आल्याने आता घरात दमडी शिल्लक नाही. पाचवी ते बारावीपर्यंत आपल्या मुलाला सैनिकी शाळेत शिकवून दरवर्षी फी शाळेची फी भरून त्याच्या देशसेवेच्या स्वप्नांना बळ देणारा शेतकरी वडील यावर्षी परिस्थितीने हतबल झाला आहे. मुलाची टीसी मार्कशीट लागल्यास २२ हजार भरावेच लागेल. अन्यथा टीसी मार्कशीट तुम्हाला मिळणारच नाही असा दम पुलगावतील सैनिकी शाळेने दिल्याने आता मुलाला पुढील महाविद्यालयात प्रवेश कसा देणार? असा प्रश्न या शेतकरी कुटूंबाला पडला आहे. त्यामुळे त्यांनी आता सरकारकडेच मदतीची याचना केली आहे.
या सगळ्या प्रकरणात शाळेनेही आपली बाजू मांडली आहे. आम्ही यशला पाचवीपासून हवी ती मदत केली. त्याचा चांगल्या दर्जाचे शिक्षण दिले. शाळेची फी जुलै किंवा ऑगस्ट पर्यंत भरणे अनिवार्य असते. परंतु यशच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्याला काही महिने सूट दिली. मात्र वर्ष उलटूनही यशच्या वडिलांनी शाळेची फी न भरल्याने त्याची टीसी आणि मार्कशीट अडविल्याचे शाळेकडून सांगण्यात आले.