दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : कोरोनाच्या संकटात महाराष्ट्रातील भूमीपुत्रांना रोजगार मिळावा या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या महाजॉब्स पोर्टलला भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्या दिवशी या पोर्टलवर ८८,४७३ रोजगार इच्छूक उमेदवारांनी नोकरीसाठी नोंदणी केली आहे. तर ज्या कंपन्यांना कामगार हवे आहेत अशा ७५१ कंपन्यांनी नोंदणी केली आहे.
दुसऱ्या दिवशी नोंदणी केलेल्या रोजगार इच्छूकांचा हा आकडा लाखाच्यावर गेला आहे. राज्यातील भूमिपुत्रांना रोजगाराची संधी देण्याबरोबरच उद्योग क्षेत्राला सहज कामगार उपलब्ध व्हावेत यासाठी राज्याच्या उद्योग विभागाने महाजॉब्स पोर्टल सुरू केलं आहे. राज्यात नव्याने येणार्या उद्योगांनी याच पोर्टलद्वारे कामगार भरती करावी अशी सूचना या उद्योगांना केली जाणार आहे.
लॉकडाऊननंतर अनेक परप्रांतीय कामगार आपापल्या राज्यात गेले आहेत. त्यामुळे त्यांना कामगार वर्ग उपलब्ध होणं अवघड झालंय. त्याचबरोबर महाराष्ट्रातील लाखो तरुणांना रोजगाराची गरज आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटात उद्योग विभागाने संधी साधत दोन्ही वर्गाच्या अडचणी दूर करण्यासाठी हे पाऊल उचललं आहे. सोमवारी ६ जून रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाजॉब्स पोर्टलचं उद्घाटन झालं होतं. तर ७ जूनपासून हे पोर्टल नोंदणीसाठी खुलं झालं होतं.
लॉकडाऊनमुळे आणि मंदीमुळे अनेकांना रोजगाराची गरज आहे, तर दुसरीकडे उद्योगांनाही कामगारांची गरज आहे, हे या पोर्टलवर झालेल्या नोंदणीवरून दिसून येते. राज्यातील उद्योगांमध्ये ५० हजार रोजगार उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे. या पोर्टलवर देखरेख ठेवण्यासाठी एमआयडीसीने कक्ष स्थापन करावा अशी सूचना उद्योगमंत्री सुभााष देसाई यांनी केली आहे.