मिरजमध्ये कृष्णा नदीवरील पुलाला भगदाड, प्रशासनाचं दुर्लक्ष

महाड पूल दुर्घटनेनंतरही प्रशासनाचं दुर्लक्ष

Updated: May 8, 2019, 08:18 PM IST
मिरजमध्ये कृष्णा नदीवरील पुलाला भगदाड, प्रशासनाचं दुर्लक्ष title=

रविंद्र कांबळे, मिरज : मिरज शहाराजवळील कृष्णा नदीवरील पुलाला भगदाड पडले असून, हा पुल धोकादायक बनला आहे. पुलाच्या मध्यभागी रस्त्यावरील लोखंडी अँगल आणि सळ्या बाहेर आल्या आहेत. त्यामुळे पुलावरुन नदीचे पाणी दिसू लागले आहे. मोठी वाहने पुलावरुन गेल्या पुल हादरत आहे. पुलावर अन्य चार ठिकाणी भेगा पडल्या आहेत. महाड पूल दुर्घटनेनंतर ही राज्यातील पुलांच्या दुरुस्थी बाबत शासकीय यंत्रणा उदासीन असल्याचं मिरजेच्या धोकादायक पुलावरून स्पष्ट होत आहे.

मिरजमधून अर्जुनवाड, नरसिंहवाडी मार्गे कोल्हापूर जिल्ह्यातील जाणाऱ्या रस्त्यावर कृष्णा घाट येथे हा पूल आहे. या पुलावरुन मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. शाळा कॉलेजची विद्यार्थी यावरूनच ये जा करतात. सरकारी आणि खाजगी बसेस, ट्रक ह्या मोठ्या प्रमाणात पुलावरुन ये जा करीत असतात. त्यामुळे वर्दळीच्या ठिकाणी हा पूल आहे. मात्र हा पुल हा धोकादायक बनला आहे. त्यामुळे प्रशासन या पुलाकडे गांभीर्यांने कधी लक्ष देणार असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

महाड पूल दुर्घटनेनंतर राज्यातील अनेक पुलांचं ऑडीट करण्यात आलं होतं. अनेक ठिकाणी पुलांची अवस्था बिकट आहे. काही ठिकाणी पुलं पाडली गेली आहेत. पण नवीन पूल कधी बांधणार याबाबत प्रशासनाकडे कोणतंच उत्तर नाही.