मुंबई : Sanjay Raut On Shiv Sena Crisis In Maharashtra : शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेचे 40 आमदार फुटलेत. त्यामुळे राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. महिना होत आला तरी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल चढवला असून राज्यात सत्ता परीवर्तन निश्चित आहे, असे प्रतिपादन केले. अनेक आमदार भावनेच्या भरात शिंदे गटात गेले आहेत. 16 आमदार अपात्र ठरणार, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
अनेक आमदार-खासदार मानसिकरित्या सध्याच्या सरकार सोबत नाहीत. ते संभ्रमावस्थेत आहेत. आज गेलेले अनेक आमदार आमच्या संपर्कात असून, भविष्यात महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्तापरिवर्तन झाल्यास आश्चर्य वाटायला नको. राज्यात पुन्हा सत्ता परिवर्तन होणार, असे भाकित राऊत यांनी केले आहे. शिंदे गटातील काही आमदार आमच्या संपर्कात आहेत, असे राऊत म्हणाले.
मुख्यमंत्री सतत दिल्ली वाऱ्या करत आहेत. आत्तापर्यंत ते पाचवेळा दिल्लीला जाऊन आले आहेत. पुन्हा ते जाण्याची शक्यता आहे. यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांवर वारंवार दिल्लीवर जाण्याची वेळ नाही आली. सध्याच्या मुख्यमंत्र्यांना आपला मुक्काम दिल्लीलाच हलवावा लागतोय का, असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे, असे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल राऊत यांनी चढवला.
सध्या EDकडून अनेकांच्या चौकशा होत आहेत. काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांना देखील EDच्या चौकशांना सामोरे जावे लागत आहे. आम्ही सर्वांनी चौकशीला हजर रहात, EDचा मान राखला आहे. याप्रकरणात मला अटक जरी झाली, तरी मी शिवसेनेकडून अटकेच्या कारवाईला सामोरे जाईन, असे राऊत म्हणाले.