कोल्हापूरच्या पुरात अडकलेल्या माकडांची थरारक सुटका

कोल्हापूर जिल्ह्यात सलग पडलेल्या पावसामुळे पुरपरिस्थीती निर्माण झाली होती.

Updated: Jul 29, 2017, 02:22 PM IST
कोल्हापूरच्या पुरात अडकलेल्या माकडांची थरारक सुटका  title=

प्रताप नाईक, प्रतिनिधी, झी मीडिया, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सलग पडलेल्या पावसामुळे पुरपरिस्थीती निर्माण झाली होती. अनेक गावांचा संपर्क तुटला होता, अनेक मार्ग बंद पडला होते.. त्यामुळं पुराच्या पाण्यात दोन दोन दिवस लोकांना अडकुन बसाव लागलं होतं.

कोल्हापूरातल्या आसुर्ले पोर्ले इथं तर काही माकडं कासारी नदीच्या पुराच्या पाण्यात अडकल्यामुळे त्यांना बाहेर येता येत नव्हतं. त्यामुळे कोल्हापूर व्हाईट आर्मी या स्वयंमसेवी संस्थेनं पुराच्या पाण्यात जाऊन 21 जुलैला या माकड्यांच्या खाण्याची व्यवस्था केली होती. त्यानंतर पुराचं पाणी कमी होईल अशी सर्वाचीच आशा होती. पण आसुर्ले इथं कासारी नदीचं पाणी कमी न झाल्यमुळं ही माकडं अशीच अडकून बसली होती.

अखेर व्हाईट आर्मीच्या मदतीनं हिल रायडर्सच्या सदस्यांनी माकडांच्या सुटकेसाठी ऑपरेशन राबवायचं ठरवलं. त्यानुसार बोटीतून जाऊन सदस्यांनी सुरवातीला माकडांना केळी खायला दिली. त्यानंतर ज्या झाडावर माकडं अडकली होती, त्या झाडाला दोर बांधून त्या दोराला केळी लटकवली आणि तो दोर दुस-या झाडाला बांधला.

त्यानंतर त्या झाडापासून नदीच्या पात्राबाहेर असणा-या विजेच्या पोलला बांधून ऑपरेशनची सुरवात केली. हे सगळं पाहून काही माकडं थोडीशी बिथरली. पण नंतर मात्र भुकेनं व्याकुळ झालेलं एक माकड दोरीवर तोल सांभाळत आणि केळी फस्त करत दुस-या झाडावर येवुन पोहचलं. त्यानंतर त्या झाडावरुन नदी किनारी पोहचलं.

एक माकड दोरीच्या सहाय्यानं बाहेर आल्याचं पाहाताच झाडावर अडकलेली सगळी माकडं टोपीवाल्याच्या गोष्टीसारखी एक एक करत कधी काठावर आली हे त्यांना कळलच नाही, त्यामुळे माकड रेस्क्यु ऑपरेशन फत्ते झालं.

पुरात अडकलेल्या माकडांची थरारक सुटका