सत्तेत असण्यापेक्षा विरोधात असण्यात अधिक समाधान- शरद पवार

Sharad Pawar: मला सत्तेत असण्यापेक्षा विरोधात असण्यात अधिक समाधान मिळालं, असे विधान शरद पवारांनी केलंय. 

Pravin Dabholkar | Updated: Feb 3, 2024, 08:43 PM IST
सत्तेत असण्यापेक्षा विरोधात असण्यात अधिक समाधान- शरद पवार  title=
Sharad Pawar

Sharad Pawar: सत्तेत असण्यापेक्षा विरोधात असण्यात अधिक समाधान असे विधान राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रमुख शरद पवार यांनी केले आहे. प्रताप पवार यांनी लिहिलेल्या 'अनुभवे आले' या पुस्तकाचं प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी ते बोलत होते. याठिकाणी माझं वय 85 सांगितलं गेलं. मी प्रत्यक्षात 84 वर्षांचा आहे. माझं वय विनाकारण एक वर्षाने वाढवण्यात आलं, अशी फटकेबाजी करत पवारांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. 

मला सत्तेत असण्यापेक्षा विरोधात असण्यात अधिक समाधान मिळालं, असे विधान शरद पवारांनी केलंय. आत्तापर्यंत 2 आत्मचरित्रे प्रकाशित झाली. काम करत असताना येणारे अनुभव त्यात आहेत. असे अनुभव येत राहिले तर पुढची आवृत्ती येवू शकते, असे ते म्हणाले.

मी कॉलेज मध्ये शिकत असताना नेता नावाचं साप्ताहिक काढलं. त्याचा दुसरा अंक निघू शकला नाही. बाळासाहेब यांच्यासोबत एक मासिक काढलं. पण त्याचा दुसरा अंक निघाला नाही, असेही ते म्हणाले.  मला व्यवहार कमी कळतो. मी अध्यात्मिकतेचा विचार कधी करत नाही, असेही पुढे ते म्हणाले. 

नानाजी देशमुख यांनी मध्यप्रदेशमध्ये खूप चांगलं काम उभे केलं. त्यांचे माझे विचार भिन्न होते. पण त्यांचं काम आदर्श घेण्यासारखं होतं. अशा अनेक लोकांचा संबंध आला. संकटाच्या काळात आपलं कर्तव्य काय हे जाणणारे लोक महाराष्ट्रात आहेत. सरकारचे पाठबळ असो वा नसो ते आणि त्यांच्या संस्था काम करत असतात. प्रशासनावर किंवा राज्यकर्त्यांवर सामाजिक संस्थांचा दवाब किंवा प्रभाव असत नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले. 

शरद पवार हे कुटुंब प्रमुख आहेत. मी आजारी पडलो तर सर्वात आधी धावून येणारे पवार साहेब आहेत, असे प्रताप पवार यावेळी म्हणाले. पवारांची प्रत्येक घटकावर घारी सारखी नजर असते. आमच्या आईने घालून दिलेल्या संस्कारामुळे ही विण घट्ट असल्याचे प्रताप पवार यावेळी म्हणाले.