Pimpri School Crime: सध्या शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये संताप आणि गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये शाळेच्या पटांगणात एका विद्यार्थ्यांने दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या पोटात चाकूने भोसकल्याची घटना घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या घटनेची अधिक चौकशी करत आहेत.
1 फेब्रुवारी रोजी 12.30 वाजता शाळा भरत होती. त्यावेळी शाळेत परीक्षा सुरु आहे. विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी शाळेत जात होता. शाळा भरत असताना एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याची बॅग ओढली. त्यावेळी ही बॅग फाटल्याने थोडी बाचाबाची झाली. त्यानंतर बॅग फाटलेल्या मुलाने परीक्षा दिली. पण परीक्षा झाल्यानंतर शाळेबाहेर मित्रांना बोलावले. यात बॅग फाडलेल्या मुलाला मारहाण केली. त्यानंतर पोटाच्या डाव्या बाजूला चाकू खुपसला. याप्रकरणी पिंपरी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली. या घटनेत नववी आणि दहावीचे विद्यार्थी आहेत.
विद्यार्थी गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पिंपरी पोलिसांनी घटनेचा तपास करत आहेत. याप्रकरणी सहा अल्पवयीन मुलांच्या नातेवाईकांना समजपत्र बजावले आहे. हे सर्व विद्यार्थी नववी आणि दहावी च्या वर्गात शिक्षण घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने यांनी दिली. सर्व विद्यार्थी अल्पवयीन असल्याने त्यांना तात्काळ अटक करण्यात आली नसल्याचेही ते म्हणाले.