विशाल करोळे, औरंगाबाद - आपण आयुष्यात जेवढी मेहनत केली, जितका त्रास भोगला तो आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये, असा विचार प्रत्येक आई- वडील मुलांबाबत करीत असतात. पण मुलं मोठी झाल्यावर तेच आई-वडिल भार होत असतील तर...
लॉकडाऊनमुळे कमवत्या हाताचं काम गेलं आणि मुलासाठी वृद्ध आईच भार बनली. मुलाने दिलेलं पत्र घेऊन माऊली वृ्द्धाश्रमात पोहचली आणि पत्र वाचून सर्वांच्याच डोळ्यात पाणी तरळलं.
मन हेलावून टाकणारी ही गोष्ट आहे औरंगाबादमधली. वयाच्या सत्तरीत मातोश्री वृद्धाश्रमात आलेल्या या माऊलीचं नाव आहे किरण पार्डीकर. चिठ्ठीतील हे शब्द प्रत्येकाच्या मनाला भिडतायेत आणि लॉकडाऊन काळातील सद्यस्थिती कथन करतायेत.
किरण पार्डीकर यांचा मुलगा मुंबईत राहतो. छोटी-मोठी काम करुन काही पैसे तो गावाकडे पाठवायचा. तर माऊली औरंगाबादला नातेवाईकांकडे राहते. काही दिवसांनी नातेवाईकांनी सुद्धा सांभाळण्याची असमर्थतता व्यक्त केली. त्यानंतर त्या औरंगाबादेत वेगळी खोली घेऊन राहू लागल्या. जमेल तशी काम करायची आणि थोडे पैसे मुलगा पाठवायचा. यावर उदरनिर्वाह होत होता. पण कोरोना काळात मुलाचा छोटा व्यवसाय पुरता कोलमडला. त्यामुळं त्याच्याकडून मदत बंद झाली. थकलेल्या माऊलीकडूनही काम होणं बंद झालं. जगावं कसं असा प्रश्न पडला. आजीने पोलीस स्टेशन गाठलं आणि थेट मला वृद्धाश्रमात सोडा अशी गळ घातली. मुलाकडून तसं पत्र मागवलं आणि वृद्धाश्रमात दाखल झाल्या. इथं आल्यावर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. आयुष्यभर काबाडकष्ट करून मुलाला मोठं केलं. मात्र आता त्याच्या जवळ राहू शकत नाही ही खंत त्यांना आहे. किमान शेवटच्या श्वासाला तरी मुलगा यावा इतकीच या माऊलीला अपेक्षा आहे.
अनेकांच्या आयुष्याची संध्याकाळ अशी एकाकी जातेय. इथले वृद्धच आता एकमेकांचे शेवटचे साथीदार.. कुटुंबियांनी कधीतरी यावे ही अपेक्षा. नाही आले तरी ठीक, फक्त जिथं आहे तिथं सुखी राहावे हाच आशीर्वाद वृद्धाश्रमातील सगळेच आजी-आजोबा देताय. आशा करुया दिवस बदलतील आणि या आजी-आजोबा हक्कानं आपआपल्या घरी परततील.
कोरोनामुळे जगाचं कंबरडे मोडले आहे. अनेकांची अवस्था बिकट झाली आहे. हेच संकट आता ज्येष्ठांवर सुद्धा आलाय.
कुटुंबाची साथ असेल तर कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी धीर मिळतो असं म्हणतात. पण उतारवयात संकट प्रसंगी कुटुंब सोबत नसल्याची भावना काय असते हे या घटनेनंतर समोर आली आहे.