अपघातात आई गमवाली, माकडाच्या पिल्लाने टेडीबियरमध्ये शोधली आई... वाचून तुमचेही डोळे पाणावतील

वर्धामधल्या या हृदयद्रावक प्रसंगाने तुमचेही डोळे पाणावतील. अपघातात आई गमावलेल्या माकडाच्या पिल्लाने टेडी बियरमध्ये आई शोधलीय. टेडी बियरच्या अंगाखांद्यावर खेळत हे पिल्लू तिचं दुधही पितं.

Updated: May 27, 2023, 05:44 PM IST
अपघातात आई गमवाली, माकडाच्या पिल्लाने टेडीबियरमध्ये शोधली आई... वाचून तुमचेही डोळे पाणावतील title=

मिलिंद अंडे, झी मीडिया, वर्धा : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarga) रस्ता ओलांडताना माकडाच्या (Monkey)  पिल्लाच्या आईला जीव गमवावा लागला. तेव्हा केवळ पंधरा दिवसाचं  हे पिल्लू ( Baby Monkey) आईलाच बिलगून होतं. तेव्हा या पिल्लाला आई मिळवून देण्यासाठी प्राणीमित्रांनी टेडी बियरची (Teddybear) शक्कल लढवली. हळुहळु या निर्जीव बाहुल्यातच या पिल्लाने आपली आई शोधली आहे. टेडी बियरच्या शरीराला दुधाची बॉटल (Bottle of Milk) लावत दूध पाजण्याची सुरुवात झाली. आता हे पंधरा दिवसांचं पिल्लू दोन महिन्यांचं झालंय. मात्र टेडी बियरलाच आपली आई समजून ते त्याला बिलगून असतं.

काय आहे नेमकी घटना
वर्ध्यानजीक पीपल फॉर ऍनिमल (People for Animals) या संस्थेचा करुणाश्रम आहे. इथं मुक्या प्राण्यावर करुणा करा हाच संदेश कृतीत उतरविण्याचे काम होत असतं. गेल्या दीड महिन्यांपूर्वी वर्ध्यात समृद्धी महामार्गावर रस्ता ओलांडताना माकडाच्या कळपातील एका मादी माकडाचा अपघात झाला. रस्त्यावर आई रक्तभंबाळ झाली असताना अवघ्या पंधरा दिवसाचे पिल्लू आईला बिलगून होते. मादी माकड आणि पिल्लाला करूणाश्रमात आणण्यात आलं. पण मादी माकडाचा जीव वाचू शकला नाही.

आईच्या मृत्यूनंतर पिल्लाचा सांभाळ करण्याचं आव्हान प्राणिमीत्रांपुढे होते. त्यावर पिल्लाला आई मिळवून देण्यासाठी प्राणीमीत्रांनी एक शक्कल लढविली. टेडी बियर म्हणजेच खेळण्यातलं मोठं बाहुलं या पिल्लाजवळ ठेवलं. हळूहळू या निर्जीव बाहुल्यात माकडाच्या पिल्लाने आपली आई शोधली. बहुल्याच्या शरीराला दुधाची बॉटल बांधून शेळीचे दूध पिल्लाला पाजण्यास सुरवात केली. दिवसेंदिवस माकडाचे पिल्लू आणि टेडी बियर यांच्यातील नातं घट्ट झालं.

पिल्लू टेडीबियरसमोर रुळलं
माकडाचं पिल्लू त्या टेडी बियर सोबत आता चांगलेच रुळलं आहे. टेडी बियर जणू आपली आईच आहे अशी समज या पिल्लाची झाली आहे. अंगा खांद्यावर खेळणे, दूध पिणे आणि  टेडी बियर सोबतच राहणे हा या पिल्लाचा नित्यक्रम आहे. मादी माकडाच्या मृत्यूनंतर भेदरलेल्या पिल्लाला बाहुल्याच्या रुपात आई मिळाली आहे. त्यामुळे लळा लागलेल्या या दोघात तिसरा जर आला तर पिल्लू मात्र त्यालाही स्वीकारत नाही. पिल्लाच्या आरोग्याची काळजी येथे नियमित घेतली जात आहे.

आई गमावलेल्या पिल्लाला बहुल्याच्या रुपात आई जरी मिळाली असली तरी रस्त्यावर होणाऱ्या मुक्या प्राण्यांच्या अपघातात वाढ होत असल्याचे हे उदाहरण आहे. वेग आवरा आणि प्राणीही जगवा असा संदेश प्राणी मित्र संघटनांनी दिला आहे.