मुंबई- गोवा महामार्गावरची कामं कधी पूर्ण होणार? अखेर तारीख ठरली

Mumbai Goa Highway : न्यायालयानं खडसावल्यानंतर राज्य शासनाला खडबडून जाग; आता कामं पूर्ण झाली नाहीत तर.... न्यायालयानंच दिली तंबी.   

सायली पाटील | Updated: Jan 4, 2024, 06:31 PM IST
मुंबई- गोवा महामार्गावरची कामं कधी पूर्ण होणार? अखेर तारीख ठरली  title=
Mumbai Goa highway repair works to be complete till 31 december 2024

Mumbai Goa Highway News: कैक सरकारं बदलल्यानंतरही राज्यातील काही गोष्टी मात्र तसूभरही बदलल्या नाहीत. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि त्याची दूरवस्था, त्यातलीच एक. पण, आता मात्र ही परिस्थिती बदलण्याची चिन्हं आहे. कारण, आता अखेर मुंबई गोवा महामार्गाची कामं पूर्ण होण्याची तारीख ठरली असून, त्यामुळं या मार्गावरून प्रवास करणाऱ्या आणि प्रत्येक प्रवासात मनस्तापाचा सामना करणाऱ्या अनेकांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. 

जवळपास दशकभराहून अधिक काळासाठी म्हणजेच 12 वर्षांहून अधिक काळापासून रखडलेल्या मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण आणि दुरुस्तीचं काम नेमकं पूर्ण कधी होणार ही तारीख आता समोर आली आहे. 

हेसुद्धा वाचा : उत्तरेकडील हाडं गोठवणाऱ्या थंडीचा महाराष्ट्रावर मात्र फारसा परिणाम नाही; काय आहे यामागचं कारण? 

राज्य सरकार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुंबई- गोवा महामार्गावरील कामं पूर्णत्वास जातील असं आश्वासन मुंबई उच्च न्यायालयाला दिलं आहे. किंबहुना या आश्वासनावर राज्य सरकार आणि एनएचआयला न्यायालयानं ताकिदही दिली असून, यापूर्वी दोन वेळा मुदतवाढ घेऊन कामं पूर्ण करण्यात आली नाहीत. त्यामुळं यावेळी कामं पूर्ण न झाल्यास त्याची गांभीर्यानं जखल घेत न्यायालयाचा अवमान केल्याप्रकणी कठोर कारवाई करू असा इशाराही दिला. 

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग (राष्ट्रीय महामार्ग 66) च्या रुंदीकरण आणि दुरुस्तीच्या कामांसह इतर सर्वच गोष्टींची कामं 31 डिसेंबर 2024  च्या आत पूर्ण करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठानं दिले. मुंबई गोवा महामार्गावरील कामात होणाऱ्या विलंबाबात वकील ओवेस पेचकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना बुधवारी न्यायालयानं महाराष्ट्र राज्य शासनाला खडसावलं.