Mumbai Metros: मुंबई मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसंदर्भात महत्वाची अपडेट येत आहे. मेट्रोच्या प्रवाशी संख्येनं एक महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे. मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्येनं २ लाखांच्या पार गेली आहे. आतापर्यंतची ही सर्वाधिक दैनंदिन प्रवासी संख्या असल्याचे सांगितले जात आहे. पावसाळ्यातही न थांबता धावणाऱ्या मेट्रोमार्ग २अ आणि मेट्रो मार्ग ७ वर मंगळवारी २ लाख, ३ हजार, ५८१ मुंबईकरांनी प्रवास केल्याची माहिती देण्यात आली आहे.
मेट्रोमार्ग २अ आणि मेट्रो मार्ग ७ कार्यरत झाल्यापासून नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. मेट्रोची सर्वाधिक दैनंदिन संख्याही नवा उच्चांक गाठत आहे. मुंबई मेट्रोचा पहिला टप्पा सुरु झाल्यानंतर म्हणजेच २ एप्रिल २०२२ ते २७ जून २०२३ पर्यंत मेट्रो प्रवासी संख्या ३,३३,८१,९२० इतकी आहे, तर पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण करताच मुंबई मेट्रोचं पहिलं जाळं या शहराला मिळालं आणि त्यानंतर मेट्रोच्या प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. २० जानेवारी ते २७ जून २०२३ या ५ महिन्यांच्या कालावधीत २,४४,१६,७७५ प्रवाशांनी मुंबई मेट्रोनं प्रवास केला.
मुंबईकरांना अतिवृष्टीमुळे त्रास होणार नाही नाही याची काळजीही मुंबई मेट्रोनं घेतली आहे. मुंबई मेट्रो मुसळधार पावसातही विना व्यत्यय आपली सेवा सुरु राहिल याची सर्वतोपरी काळजी आधीच घेण्यत आली आहे. नागरिकांसाठी महा मुंबई मेट्रोने मान्सून कंट्रोलरूम देखील सुरु केली आहे. प्रत्येक मेट्रो स्थानकावर ६४ कॅमेरा प्रत्येक घटनेची नोंद घेत आहे.
विनाव्यत्यय किंवा सीमलेस प्रवासासाठी सुरु करण्यात आलेल्या मुंबई-१ नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड सुविधेला देखील नागरिकांनी पसंती दिली आहे . आतापर्यंत जवळपास १,१४,१७१ प्रवाशांनी मुंबई वन कार्डाचा लाभ घेतला आहे.