Mumbai-Pune एक्सप्रेस वेवरील बोगद्यात विचित्र अपघात! एकाचा मृत्यू

Mumbai Pune Expressway Accident: गणेशोत्सवानिमित्त सध्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील वाहनांची संख्या वाढल्याचं चित्र दिसत असतानाच आज सकाळी या मार्गावर एक भीषण अपघात झाला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 10, 2024, 08:38 AM IST
Mumbai-Pune एक्सप्रेस वेवरील बोगद्यात विचित्र अपघात! एकाचा मृत्यू title=
एकजण जखमी झाला आहे (फाइल फोटो, सौजन्य इन्स्टाग्राम)

Mumbai Pune Expressway Accident: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर म्हणजेच एक्सप्रेस वेवर आज पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हा अपघात पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या मार्गिकेवर झाला आहे. या अपघातामध्ये एकजण जखमी झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या दिशेने जात असणाऱ्या मार्गिकेवर खालापूरजवळच्या माडप बोगद्यामध्ये एका खासगी बसने समोर चालत असलेल्या पीकअप व्हॅनला धडक दिली. ही धडक एवढ्या जोरात होती की पीक अप व्हॅन बोगद्याच्या भिंतीला धडकली. बोगद्यामध्ये हा अपघात झाल्याने तातडीने मदत पोहचवण्यामध्ये साधारण वेळेपेक्षा अधिक वेळ लागला. मात्र बचाव पथकांमधील प्रशिक्षित जवानांनी आधी जखमींना अपघातस्थळापासून दूर नेलं. त्यानंतर संपूर्ण काळजी घेत दोन्ही अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या मदतीने रस्त्यावरुन बाजूला घेतली. यावेळेस वाहनांमधून इंधन गळती होणार नाही किंवा इतर समस्या निर्माण होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली. 

अपघातग्रस्त वाहने बोगद्यामधील मार्गिकेमधून बाहेर काढल्यानंतर दोन्ही बाजूची वाहतूक सुरळीत करण्यात यंत्रणांना यश आलं. या अपघातामध्ये बसच्या पुढील बाजूला मोठं नुकसान झालं असून सदर प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.