माझी एकुलती एक लेक, 2 दिवसांनी घरी परतणार होती; मुंबईतील मृत मुलीच्या वडिलांना अश्रू अनावर

Mumbai Girl Hostel Murder Case: चर्चगेट परिसरात (Churchgate) एका तरुणीवर अतिप्रसंग करुन हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर या प्रकरणात तरुणीच्या वडिलांनी गंभीर आरोप केले आहेत. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 7, 2023, 04:20 PM IST
माझी एकुलती एक लेक, 2 दिवसांनी घरी परतणार होती; मुंबईतील मृत मुलीच्या वडिलांना अश्रू अनावर title=
Mumbai Teen Killed In Hostel victims father alleged administration

Mumbai Girl Hostel Murder: मुंबईतील मरिन ड्राइव्ह येथील सावित्रीबाई फुले महिला शासकीय वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावर १९ वर्षीय तरुणीचा विवस्त्रावस्थेत मृतदेह सापडल्याने एकच खळबळ माजली आहे. तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणारत पोलिसांना वसतिगृहाचा सुरक्षारक्षक ओमप्रकाश कनोजिया यावर संशय होता. मात्र त्यानेच रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली. या प्रकरणी आता पीडित तरुणीच्या वडिलांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी वसतिगृहाच्या प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.

मंगळवारी सावित्रीबाई फुले महिला शासकीय वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावर विवस्त्रअवस्थेत तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. तरुणीवर अतिप्रसंग करुन तिची हत्या करण्यात आली. या घटनेत पोलिसांना वसतिगृहाचा सुरक्षारक्षक ओमप्रकाश कनोजिया याच्यावर संशय होता. मात्र, चर्नी रोड व ग्रँट रोड स्थानकादरम्यान त्यांना त्याचा मृतदेह सापडला. त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. दरम्यान या प्रकरणात पीडित तरुणीच्या वडिलांनी वसतिगृहाच्या डीनवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. गुन्हा दाखल न केल्यास मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला नाही. 

चौथ्या मजल्यावर मुलीला एकटीला ठेवले

'माझ्या मुलीला चौथ्या मजल्यावर एकटं ठेवलं होतं. तिच्यासोबत दुसऱ्या कोणत्याही मुलीला ठेवलं नाही. हे त्यांना शोभते का? माझ्या मुलीसोबत जे घडलं त्याला वसतिगृहातील अंधारे मॅडम आणि कोळी मॅडम कारणीभूत आहेत आहेत. माझी ती एकुलती एक मुलगी होती,' असं म्हणत पीडितेच्या वडिलांनी म्हटलं आहे.

मुलीचा मृतदेह स्वीकारणार नाही

'या सरकारी वसतिगृहातच माझी मुलगी सुरक्षित नाही, मग न्याय कोणाकडे मागायचा, मला न्याय कसा मिळणार. त्या दोन मॅडमवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. अन्यथा मी माझ्या मुलीचा मृतदेह स्वीकारणार नाही,' अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. 

दोन दिवसांनंतर घरी जाणार होती

'माझ्या मुलीने परवाचं आम्हाला सांगितलं होत की ओमप्रकाश नावाचा वॉचमन मला १५ दिवसांपासून त्रास देतो आहे. वरच्या मजल्यावर येऊन तो सारखा लाइट चालू-बंद करतो. मला त्याची भीती वाटते हेदेखील तिने सांगितले होते, असंही तिच्या वडिलांनी सांगितलं आहे. येत्या दोन- तीन दिवसांत ती गावी घरी जाणार होती. तिने ट्रेनचेही तिकीट काढले होते,' असं सांगताना तिच्या वडिलांचा बांध फुटला. 

माझी मुलगी दररोज फोन करायची, पण कालच (6 जून) केला नाही. त्यानंतर मी तिला वारंवार फोन केला, पण तिच्याकडून कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यानंतर पोलिसांचाच फोन आला, असं सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले होते.