अमर काणे, झी 24 तास, नागपूर : डॉक्टरांना देवमाणूस म्हणतात ते उगाच नाही. देवासारखं धावून रुग्णांचे प्राण वाचवण्याचं काम करतात. नागपुरातील डॉक्टरांनी देशातील एक अनोखी शस्त्रक्रिया पार पाडली आहे. एका रुग्णाच्या हृदयातून 12.75 सेमी आकाराची गाठ काढली.
नागपुरातील डॉक्टरांनी रुग्णाला त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करून जीवदान दिलं आहे. भारतातील आतापर्यंतची इतकी मोठी गाठ हृदयातून काढण्याची पहिलीच अशी ही शस्त्रक्रिया असल्याचा दावा नागपुरातील कार्डियो व्यस्क्युलर तज्ञ डॉ सौरभ वार्ष्णेय यांनी केला आहे.
जगात आतापर्यंत सर्वात मोठी 14 सेमीची गाठ हृदयातून काढल्याची नोंद तुर्की मधील डॉक्टरांच्या नावावर आहे. मध्यप्रदेश मधील सौसर येथील 35 वर्षीय रुग्णाच्या हृदयात गाठ असल्याचे काही महिन्यांपूर्वी निदान झालं होतं .
या रुग्णाला नीट श्वासही घेता येत नव्हता; झोपता येत नव्हतं, अत्यंत गंभीर स्थितीत हा रुग्ण नागपुरात डॉ सौरभ वार्ष्णेय
यांच्याकडे उपचाराकरता दाखल झाला. त्यानंतर या रुग्णावर बेंटल सर्जरी करण्याचे ठरले. डॉक्टरांनी अतिशय जोखमीची आणि अवघड अशी शस्त्रक्रियया करत जीवदान दिले.