Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Results 2024 : विधानसभा निवडणुकीत महायुतीनं एकतर्फी विजय मिळवलाय. महायुतीच्या विजयात काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागलाय. महायुतीच्या त्सुनामीनं महाविकास आघाडी नेस्तनाबूत झालीय. महायुतीच्या सुनामीच्या लाटेत अनेक दिग्गज काँग्रेस नेत्यांचा पराभव झाला.
कराड दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झालाय. भाजपचे डॉ. अतुल भोसले यांनी चव्हाण यांचा सुमारे 39 हजार 355 मतांनी पराभव केला. भोसले यांना एक लाख 39 हजार 705 मतं मिळाली. तर पृथ्वीराज चव्हाण यांना एक लाख 150 मते मिळाली.
माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. तिवसा विधानसभा मतदारसंघात भाजपने यशोमती ठाकूर यांच्याविरोधात राजेश वानखेडे यांना उमेदवारी दिली होती. यशोमती ठाकूर यांचा 10 हजार मतांनी पराभव झाला आहे.
गेल्या 40 वर्षापासून संगमनेर हा काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतील चेहरा मानला जाणाऱ्या बाळासाहेब थोरातांचा बालेकिल्ला. आठवेळा जिंकल्यावर नवव्या निवडणुकीत थोरातांचा धक्कादायक पराभव झालाय.
काँग्रेससाठी हा सर्वात मोठा धक्का मानण्यात येत आहे. आघाडीची सत्ता आली असती तर ते काँग्रेस पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार होते. बाळासाहेब थोरातांचा एका नवख्या तरूणांनं पराभव केलाय. पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे अमोल खताळ यावेळी जायंट किलर ठरलेत. अमोल खताळ यांनी विजय मिळवत थोरातांच्या सत्तेला सुरूंग लावलाय.