Nagpur Online Gambling: ऑनलाइन जुगाराच्या नादी लागून संसार उद्धस्त झालेल्या अनेक घटना आजुबाजूला समोर येत असतात. पण पैशांची लालसा माणसाला स्वस्त बसू देत नाही. त्यात खूप मोठा फटका बसतो. अशीच एक घटना नागपुरातून समोर आली आहे. येथे एका व्यावसायिकाला ऑनलाइन जुगारात तब्बल ₹ 58 कोटींचा फटका बसला आहे.
नागपुरच्या व्यावसायिकाने सुरुवातील ऑनलाइन जुगारात 5 कोटी रुपये जिंकले. यानंतर त्याने आणखी रक्कम गुंतवली. त्यात त्याला 58 कोटींचे नुकसान सहन करावे लागले. नागपूर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे. पोलिसांनी संशयित बुकीकडे धाड टाकून चार किलो सोन्याच्या बिस्किटांसह 14 कोटी रुपयांची रोकड जप्त केली. एका उच्च पोलीस अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली.
अनंत उर्फ सोंटू नवरतन जैन असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी नागपूरपासून 160 किमी अंतरावर असलेल्या गोंदिया शहरातील त्याच्या राहत्या घरी छापा टाकला. दरम्यान त्याआधीच तो पळून गेलो होता. तो दुबईला पळून गेल्याचा पोलिसांना संशय आहे.
समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी नवरतन जैन याने तक्रारदार व्यापाऱ्याला ऑनलाइन जुगारा हा नफा कमावण्यासाठी कसा सोपा मार्ग आहे हे पटवून दिले होते. सुरुवातीला व्यावसायिकाने संकोच केला पण अखेर जैनच्या समजूतीला बळी पडून हवाला माध्यमातून 8 लाख हस्तांतरित केले, असे नागपूरचे पोलिस आयुक्त अमश कुमार यांनी सांगितले.
जैन याने व्यावसायिकाला ऑनलाइन जुगार खाते उघडण्यासाठी व्हॉट्सअॅपवर लिंक दिली. त्यानंतर व्यावसायिकाला खात्यात 8 लाख रुपये जमा झाल्याचे आढळले आणि तो जुगार खेळू लागला, असे कुमार म्हणाले.
सुरुवातीला व्यावसायिकाला यश मिळत गेले. त्यामुळे त्याचा ऑनलाइन जुगारावर विश्वास बसू लागला. व्यावसायिकाचा पाय अधिक खोलात जाण्याची हीच खरी सुरुवात होती. आता व्यावसायिकाने 5 कोटी रुपये गुंतवले. आता आपल्याला मोठी रक्कम मिळेल असे स्वप्न पाहत असताना त्याच्या अकाऊंटमधून 58 कोटी रुपये गेल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली. व्यावसायिकाने पैसे मागितले पण जैन याने ते दिले नाहीत. त्याने व्यावसायिकाशी संवाद साधणे बंद केले. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे व्यावसायिकाच्या लक्षात आले.
यानंतर व्यावसायिकाने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. जैनविरोधात भारतीय दंड संहितेअंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी जैन यांच्या गोंदियातील निवासस्थानावर छापा टाकला. या कारवाईत 14 कोटी रोख आणि चार किलो सोन्याच्या बिस्किटांसह भरपूर पुरावे जप्त करण्यात आले, अशी माहिती कुमार यांनी दिली.मोठ्या प्रमाणात रोकड मोजली जात असून जप्तीचा अंतिम आकडा अजून येणे बाकी असल्याचे सांगण्यात आले.