अमर काणे, नागपूर : नागपूरमध्ये एकाने दारूच्या नशेत आपल्या वयस्कर सासू-सासऱ्यांची हत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण नागपूर हादरलं आहे. या व्यक्तीने कुऱ्हाडीने वार यांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. इतकंच नाही तर आरोपीने पत्नी आणि मुलीवरही यावेळी कुऱ्हाडीने हल्ला केला.
या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. नागपूर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमर नगरमध्ये ही संपूर्ण घटना घडलीये. कौटुंबिक वादातून ही घटना घडली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येतेय.
नरमू यादव असं या आरोपीचं नाव आहे. दारूच्या नशेत असलेल्या नरमू यादवने सासू-सासऱ्यांवर कु्ऱ्हाडीने प्राणघातक वार केले. या हल्ल्यात वृद्ध सासू-सासरे यांचा मृत्यू झाला. भगवान खाडे आणि पुष्पा खाडे असे मृत सासू-सासऱ्यांचं नाव आहे.
यानंतर आरोपी नरमू यादवने पत्नी कल्पना यादव आणि मुलगी मुस्कान या दोघींवरही कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्यात या दोघीही गंभीर जखमी झाल्यात. या दोघींचीही प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 3-4 दिवसांपासून कुटुंबात वाद सुरू होते. शनिवारी रात्री आरोपी नरमू यादव दारू पिऊन आला होता. या दारूच्या नशेतच त्यांने पुन्हा जुन्या वादामुळे भांडण झालं. आणि त्यानंतरच ही घटना घडली असल्याचं म्हटलं जातंय
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला घेतल्यानंतर त्याला अटक केली. पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.